प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे ऍक्शन मोडवर….
नदीत सर्व ठिकाणी पथके तैनात
चोवीस तासात 2 ट्रॅक्टर, 2 टेम्पो महसूल विभागाच्या ताब्यात

अमळनेर : तालुक्यात वाळू चोरीचा विषय ऐरणीवर आला होता. विविध माध्यमांनी अनेक बातम्या प्रसारित केल्या होत्या. अनेक तक्रारी देखील झाल्या होत्या. म्हणून आता वाळू चोरीबाबतची दखल प्रांताधिकारी श्री नितिनकुमार मुंडावरे यांनी घेतली आहे.
सोमवारी प्रांताधिकारी श्री.मुंडावरे यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांची बैठक घेतली होती. व त्यात सगळ्यांनाच धारेवर धरले होते. यात ज्यांच्या मनात चोर होता ते बरोबर शांत झाले आहेत. नद्यांध्ये जेथे वाळू चोरी केली जाते त्या ठिकाणी पथके नेमून तैनात करा अशाही सूचना प्रांताधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे यांनी केल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी पथके नेमून तैनात करण्यात आली होती.
प्रांताधिकारी मुंडावरे यांनी आखलेला ऍक्शन प्लॅन, सूचना व मार्गदर्शन यानुसार अवघ्या चोवीस तासात अमळनेर बोरी काठावरील दोन ट्रॅक्टर व दोन टेम्पो अशा चार वाहनांवर कारवाई करण्यात आली असून चारही वाहनांना अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी वाळू चोरी विरोधात घेतलेल्या पुढाकाराने व वाहनांवर ज्यांनी कारवाई केली त्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्यांनी अवैध गौण खनिज केले त्यांची खैर नाही…. प्रांताधिकारी मुंडावरे

आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी गौण खनिज चोरी विरोधात सतर्क असून कोणत्याही ठिकाणी गौण खनिज चोरी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. या बाबत आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. ज्यांनी अवैध गौण खनिज केले त्यांची खैर नाही.
श्री. नितीनकुमार मुंडावरे – प्रांताधिकारी, अमळनेर
