दिव्य लोकतंत्र पोर्टलवर सायबर हल्ला : सत्याचा आवाज दाबण्याचा घृणास्पद प्रयत्न

0
IMG-20250629-WA0021

सत्याचा लढा अजून तीव्र होईल….. मुख्य संपादक

संपादकीय विशेष: लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा आणि ग्रामीण जनतेच्या मनातील भावना निर्भीडपणे मांडणारा दिव्य लोकतंत्र हा वेब पोर्टल काल सायंकाळी अचानक काही वेळासाठी बंद झाला. तांत्रिक कारणांमुळे काही वेळेसाठी पोर्टल डाऊन झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, काही तासांनंतर समोर आलेली खरी माहिती धक्कादायक होती – हे एक नियोजित सायबर हॅकिंग होतं.

सत्याचे धारदार लेख, अन्यायाविरुद्ध उघडपणे लिहिणारी भितीमुक्त पत्रकारिता आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारी भूमिकेमुळे दिव्य लोकतंत्र पोर्टल सध्या ग्रामीण महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु हीच निर्भीडता काहींना खटकली असावी.

हॅकिंग फक्त तंत्रज्ञानावर नाही, हा हल्ला होता विचारांवर…!

एका सायबर हॅकरने अवघ्या काही मिनिटांत डेटाबेस उडवत पोर्टल डाऊन केलं. “Error establishing a database connection” असा संदेश स्क्रिनवर झळकत राहिला. अनेक वाचक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी संपर्क साधून चौकशी केली. पण सत्य हळूहळू उघड होत गेलं – ही कोणतीही चुकून घडलेली घटना नव्हती, हा एक मुद्दाम घडवून आणलेला ‘सायबर अटॅक’ होता.

कोण घाबरतं? सत्याला सामोरं जाण्याची हिंमत नसणारे…

मुख्य संपादक डॉ. समाधान मैराळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा हल्ला केवळ एका पोर्टलवर नाही, हा हल्ला लोकशाहीच्या हक्कांवर आहे. हा हल्ला मुक्त विचार, निर्भीड अभिव्यक्ती आणि सत्याच्या आवाजावर आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही झुकणार नाही. सत्य मांडणे ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही निभावत राहू.”

ज्यांना प्रश्न विचारले जातात, तेच सर्वाधिक अस्वस्थ होतात…

हॅकिंग मागे नेमकं कोण होतं, याचा तपास अद्याप सुरू आहे. तांत्रिक पातळीवर काही सुराग मिळाले असून सायबर सेलकडे याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. परंतु मोठा प्रश्न असा आहे की – एका स्वाभिमानी पत्रकारितेच्या मंचाला कोण घाबरतं? त्यांची भीती केवळ या गोष्टीची आहे की – सत्य जनतेपर्यंत पोहोचू नये.

ज्याचं काही चुकलेलं नसतं, तो सत्याला घाबरत नाही.

दिव्य लोकतंत्रने अनेक वेळा स्थानिक स्तरावर झालेल्या अन्याय, प्रशासनातील हलगर्जीपणा, राजकीय स्वार्थ आणि सामाजिक विषयांवर प्रखर लिखाण केले आहे. या माध्यमाने ज्या प्रकारे जनतेला आवाज दिला आहे, त्यातून अनेक वेळा अस्वस्थ झालेल्या शक्तींपैकी कुणीतरी हा कट रचला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुन्हा उभं राहणं हीच आमची ताकद आहे.

हा सायबर हल्ला केवळ काही तासांपुरता आमचं पोर्टल बंद करू शकतो, पण आमची जिद्द, आमचं स्वाभिमान, आणि आमची लोकशाहीप्रती निष्ठा कोणीही बंद करू शकत नाही. आमची टीम अवघ्या काही तासांत तांत्रिक अडथळे दूर करून पुन्हा पोर्टल जनतेच्या सेवेत सुरू करण्यात यशस्वी झाली.

हल्ला आमच्यावर नाही तर हल्ला लोकशाहीवर आहे.

आज प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारितेला संपवण्याचे हे प्रयत्न वाढत आहेत. पोर्टल डाऊन करणे म्हणजे आवाज बंद करण्याचा प्रयत्न. पण आवाज हा बाहेरून बंद होत नाही. तो आतून येतो – आणि आमच्याकडे तो आवाज आहे. शंका घेणारी, उत्तर मागणारी, सत्याचा आग्रह धरणारी पत्रकारिता आज अधिक महत्त्वाची आहे.

संपादकीय टीमचा निर्धार स्पष्ट आहे

“लोकशाहीवर असलेले आमचे निष्ठावान प्रेम, आणि सत्यावर असलेली आमची निष्ठा कधीच खचणार नाही. आम्ही लिहित राहू. मांडत राहू. प्रश्न विचारत राहू. आणि सत्य शोधत राहू.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!