प्रसूती वेदना सहन करत महिला दोन किलोमीटर चालत आली….
कोणतीही वैद्यकीय सुविधा अथवा रुग्णवाहिका न मिळाल्याने सारबेटे येथे रस्त्यावरच महिला प्रसूत झाली
आमदार साहेब अमळनेरची आरोग्य यंत्रणा ढासळलीये ती सुधरवा…

अमळनेर : प्रसूत वेदना म्हणजे महिलेचा पुनर्जन्मच होय.मात्र त्या वेदनाही होत असून कोणतीही आरोग्य सुविधा मिळणार नाही व आपला नवरा देखील कामाला गेलाय म्हणून स्वतः महिला आपल्या मुलांना घेऊन सारबेटे तांडा येथून सरळ सारबेटे बु. पर्यंत पायी आली. मात्र प्रसूती वेळ जवळ आल्याने सारबेटे बु. येथेच रस्त्यावरील एका घराच्या ओट्यावर ती महिला प्रसूत झाली.
ही घटना आहे सोमवारी 23 जून रोजी मध्यरात्रीची…. संजना शांताराम राठोड (वय अंदाजे 30 वर्ष) ह्या महिलेची प्रसूतीची तारीख जवळ आली होती. 23 रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. सारबेटे तांडा या गावात कोणतीही वैद्यकीय सुविधा नाही…. प्रसूती संजना वाढल्या…. नवरा घरी नाही…. अशा परिस्थितीत संजनाने धाडसी निर्णय घेत पायी चालत ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्र गाठण्याचे ठरवले. सारबेटे तांडा ते सारंबेटे बु. यात सुमारे 2 किलोमीटरचे अंतर…. त्यात मध्ये वनीकरणाचा भाग…. चांगला पहिलवानही जाईल तर त्याला देखील भिऊ वाटे अशा रस्त्याला पार करून आपल्या दोन मुलांसह वंदना आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी पायी चालत आली. सारबेटे येथे पोहचल्यावर संजनाला प्रसूत वेदना जास्त सुरू झाल्या…. प्रसूतीची वेळ जवळ आली….. ती वेदनांनी रडत होती… जवळच्या लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना फोन केला… कुणीही फोन उचलेना…. 10 मिनिटांचे आश्वासन देणारी रुग्णवाहिका देखील आली नाही….. अशातच सारबेटे बु. येथील रहिवासी विशाल ब्रम्हे यांच्या रस्त्यावरील घराच्या ओट्यावर तिला जवळपासच्या महिलांनी कोणताही मार्ग दिसत नसल्याने तेथेच प्रसूत केले. आणि संजनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नंतर तेथीलच महिलांनी तिला कपडे दिले व गावातील गाडीला बोलावून ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले.
आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत. आपला देश खूप पुढे गेला. दोन मिनिटात पिझ्झा येणाऱ्या या देशात 10 मिनिटात रुग्णवाहिका येत नाही, ही शोकांतिका आहे. आपल्याच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाली नसल्याने महिला मरण पावते… अशीच घटना अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातही घडते….. काही दिवसांपूर्वी मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व रुग्णवाहिका नसल्याने महिला अमळनेर येथे येताच काही सेकंदात प्रसूत होते, ही महिला काही पाऊल चालत आली असती तर चालता – चालताच प्रसूत झाली असती अशी भीती नातेवाईकांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त करून दाखवली होती… आणि या कर्मचाऱ्यांची ही भीती खरी ठरली मात्र ती सारबेटे तांडा येथील संजना राठोड हिच्या बद्दल कारण संजना ही सारबेटे तांडा ते ढेकू आरोग्य केंद्राच्या रस्त्यातच प्रसूत झाली.
अमळनेर मतदार संघात विकासाची गंगा वाहत असल्याने अनेक महानुभाव सांगत आहेत. मात्र मूलभूत गरजांमधून फक्त आरोग्य सेवाही पूर्ण होत नसेल तर तुमच्या विकासाच्या गंगेला काय करणार सामान्य जनता असा प्रश्न उपस्थित होतो….
म्हणून आमदार अनिल पाटील यांना या निमित्ताने आवाहन करावं असं वाटतंय की, ह्या अडचणी आपल्या परिवाराच्या समोर आहेत असे समजून तालुक्यातील ढासळलेली आरोग्य यंत्रणा सुधरवा. नाही तर आपल्या माजी मंत्री व आता आमदार पदाचा काहीच फायदा नाही असे मत सध्या जनता व्यक्त करीत आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात खूप कमी कर्मचारी संख्या असून त्यात उपकेंद्रांची परिस्थिती अजूनच नाजूक आहे. आरोग्य उपकेंद्रांवर प्राथमिक उपचारसाठी लागणारे साहित्य देखील नसल्याचे अनेक रुग्णांनी म्हटले आहे. याची क्षमता सुधरवण्याची आवश्यकता आहे. पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत त्यात रुग्णवाहिकेवर फक्त एकच वाहक कायमस्वरूपी असून इतर सर्व रुग्णवाहिका रोजंदारी काम करणाऱ्या वाचकांच्या हवाले आहे. तिकडे १०८ वाली बिव्हीजी कंपनी रुग्णांना सेवा देत असल्याचे सांगत लाखोंचे बिल जिल्ह्यातुन काढत असून मात्र बिव्हीजी कंपनीची रुग्णवाहिका देखील वेळेवर उपस्थित राहत नसल्याने यांना कोट्यवधी रुपये कशासाठी दिले जातात हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सलाम सारबेटे बु. येथील बंधू – माता – भगिनींना…
संजना राठोड रडत असून ती एकटी आहे व तिला खूप प्रसूत वेदना होत आहेत हे पाहून खटूबाई ब्रह्मे ,विद्या ब्रह्मे , नंदाबई बनसोडे, वैजयंताबाई ब्रह्मे , सरलाबाई ब्रह्मे , आशासेविका कामिनीबाई ब्रह्मे, शांताबाई ब्रम्हे आदींनी तिला प्रसूत होण्यासाठी सहकार्य केले तर विशाल ब्रह्मे, ज्ञानेश्वर ब्रह्मे, अनिकेत ब्रह्मे, उपसरपंच राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य देशमुख वंजारी व अनिल पाटील, भावलाल ब्रम्हे आदींनी प्रसूती नंतर संजनाला प्राथमिक आरोग्य केंद्र ढेकू येथे नेले.
