काम तर निकृष्टच, मात्र नाला कुठं तर पुलाचे बांधकाम कुठं
पिंपळे आश्रमशाळा ते आर्डी रस्त्याच्या चौकशीची मागणी

अमळनेर : तालुक्यातील पिंपळे आश्रमशाळा ते आर्डी गावाच्या अलीकडे झालेल्या रस्त्याच्या चौकशीची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. कारण हे काम निकृष्ट तर आहेच मात्र एका ठिकाणी पूल देखील चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आला आहे. ह्या ठिकाणी नाल्याचा प्रवाह वेगळा असून त्यावरील पूलहा वेगळ्याच ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. म्हणून नाला कुठं तर पूल कुठं असल्याने नाल्याचे पाणी नेमके रस्ता पोखरणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतो.
आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाला असून त्यांनीच उमेश शाह नामक ठेकेदारास हे काम दिल्याचे समजते. म्हणून आमदार अनिल पाटील यांनी हे काम योग्य रीतीने करणाऱ्या ठेकेदारास द्यायला हवे होते असे म्हणत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संरक्षण भिंत बांधावी…
सदर पुलाचे काम हे चुकीच्या ठिकाणी होत असून नाल्याचे येणारे पाणी सरळ रस्त्याला धडकणार आहे म्हणून रस्त्याकडे जाणारे नाल्याचे पाणी थांबण्यासाठी रस्त्यालगत संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी पिंपळे येथील तरुणांनी केली आहे.
आमदारांकडून दुजाभाव….?
तर मंगरूळ पासून पिंपळे आश्रम शाळेपर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने त्या रस्त्याला मंजुरी का मिळत नाही ? आमदार साहेब काही गावांसोबत दुजाभाव करतात का असा सवाल मंगरूळचे ग्रामस्थ, प्रवासी व वाहन चालकांनी उपस्थित केला आहे.
अमळनेर येथून मंगरूळ पर्यंत एकदम उत्तम रस्ता असून मात्र मंगरूळ पासून जवखेडे कडे जातांना पिंपळे आश्रम शाळेपर्यंत अत्यंत रस्ता खराब झाला आहे. तेथूनही आर्डी गावापर्यंत रस्ता आता बनला असून तोही निकृष्ट असल्याने जास्त दिवस टिकेल असे वाटत नाही. तर आर्डी पासून पुढेही रस्ता खराबच झाला आहे.
दरम्यान पिंपळे आश्रमशाळा ते आर्डी गावाच्या अलीकडे तयार झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट असून पुलाच्या बांधकामास आतापासूनच तडे पडलेले आहेत. ह्या कामात बांधकाम साहित्य उत्तम दर्जाचे वापरण्यात आलेले नाही अशा अनेक बाबींमुळे सदर कामाची चौकशी व्हावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
