जिथं आहे गरज, तिथं प्रकटतो नारद….
गरजेच्या ठिकाणी कामे नाहीत; अनेक ठिकाणचे रस्ते झाले खराब

अमळनेर : मतदारसंघात जिथं गरज आहे त्या ठिकाणी कामे होत नाहीत. मात्र ज्या ठिकाणी एकमात्र गरज नाही तेथे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा मात्र चांगलाच आशीर्वाद असल्याचे असल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्ड्यात आहेत की, खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही. मात्र असे असतांना मात्र ज्या ठिकाणी काहीच गरज नाही, काही महिन्यांपूर्वी रस्ते झाले तेथे मात्र डबल काम टाकण्याचे काम जोरात आहे.
कामावर काम केल्याने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना टक्केवारी व नफा जास्त प्रमाणात मिळत असल्याची जोरदार चर्चा मतदार संघात सुरू आहे. कारण ठेकेदारांचा अनेक खर्च यामुळे वाचत असतो.
तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात येत आहेत. या बंधाऱ्यांच्या काही मीटर अंतरावर आधीच एक बंधारा आहे. मात्र तरीही त्याच ठिकाणी बांधणारा बांधण्याचा घाट घातला जात आहे. यात देवळी व मारवड गावाजवळचा बंधारा साक्ष देतो. चोपडा रस्त्याच्या देवळी गावाजवळच्या बंधांऱ्याला अनेक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे, मात्र तो विरोध झुंगारून कामे केली जात आहेत. ह्या बंधाऱ्यांची जागा शासकीय यंत्रणा नव्हे तर बाह्य राजकिय यंत्रणा ठरवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जनता जर विरोध करत असेल तरी कामे होत असतील तर यात कोणाचा वैयक्तिक स्वार्थ तर नाही ना हा प्रश्न उपस्थित होत आहे. अमळनेर मतदारसंघात व तालुक्यातील अनेक अशी गावे आहेत ज्या गावांमध्ये जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत, मग ज्या ठिकाणी गरज आहे ती ठिकाणे सोडून भलत्याच ठिकाणी कामे देणे हे कितपत योग्य आहे. म्हणून जिथं आहे गरज तिथं नारद प्रकटतो का असा प्रश्न निर्माण होतो. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने द्यावी हीच अपेक्षा !
