अमळनेरात निकृष्ट कामांचा धडाका….
कामांची चौकशी होण्याची गरज

अमळनेर : मतदार संघात अनेक शासकीय कामे निकृष्ट दर्जाचे होत असून या कामांची राज्य शासनाच्या गुण नियंत्रण विभागामार्फत चौकशी होण्याची गरज आहे.
अमळनेर शहरासह तालुक्यातील होत असलेले रस्ते, शासकीय इमारती, यांसह अनेक कामे निकृष्ट स्वरूपाचे दिसून येतात. शहरातील ग्रामीण रुग्णालय, प्रशासकीय इमारतीचा देखील हाच विषय आहे. तर सिमेंट काँक्रीटचे रस्ते देखील आज झाले आणि काही दिवसांनी खराब होतील अशी परिस्थिती आहे. शासनाचे करोडो रुपये वाया जात असल्याची चर्चा आहे.
अनेक राज्य मार्ग, जिल्हा मार्गांवर होत असलेली कामे तर प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांची कामे तर अजून जास्त प्रमाणात निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहेत. जुन्या कामांवर थुंक लावून कामे केली जात असून त्यांचे बिले काढत मोठी मलिदा लाटण्यात येत आहे.

निकृष्ट कामे करून मलिदा लाटण्याचा प्रयत्न
अमळनेर मतदारसंघात निकृष्ट कामे करून संबंधित लोकं मलिदा लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी टक्केवारी देखील मोठ्या प्रमाणात जात असल्याने अनेकांची तोंडे बंद असल्याचे देखील बोलले जात आहे.
आमदार अनिल पाटलांनी लक्ष देण्याची गरज
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी लक्ष देण्याची गरज आहे. ते ठेकेदार असल्याने त्यांना या बाबत जास्त माहिती असून ते निकृष्ट दर्जाचे कामे होऊ देणार नाहीत असेही अनेकांचे मत आहे. तर अशा प्रकारची कामे होत असल्याने आमदार पाटील यांची प्रतिमा डागाळण्याची चिन्हे आहेत.
