मंगळग्रह मंदिर संस्थानाने मंदिराबाहेरील दुकाने हटवली…
गरीब दुकानदारांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार
अमळनेर : येथील मंगळग्रह मंदिर संस्थानाला अनेक प्रकारे शासकीय निधी येत असतो. तर प्रत्येक आठवड्यात हजारो भाविक याठिकाणी भेटी देत असतात. यावेळी दक्षिणा रुपी अनेक मदत देखील मंगळग्रह मंदिर संस्थानाला मिळत असते. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी मंगळग्रह मंदिराचे नाव घेतले जाते, तर संपूर्ण भारतातले लोकं याठिकाणी भेटी देत असतात, अनेक लहान – मोठे राजकारणी, अभिनेते, उद्योजकही याठिकाणी भेटी देत असून मोठ्या प्रमाणात मंगळग्रह मंदिराचा विकास होत आहे.
मात्र असे असतांना सध्या मंगळग्रह मंदिर सध्या दातृत्व सोडून व्यवसायिक भूमिका घेतांना दिसून येत आहे. मंगळग्रह संस्थान प्रशासनाने मंदिराच्या बाहेर असलेली पूजा साहित्य व इतर वस्तूंची दुकाने काढून आपली स्वतःची पूजा साहित्य विक्री करण्याची दुकाने सुरू केली आहेत. यामुळे त्याठिकाणी असलेल्या अनेक दुकानदारांच्या पोटावर पाय गेल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. काही दुकानदार त्याठिकाणी आपला दुकान व्यवसाय करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करीत असतात मात्र ही दुकाने बंद झाल्याने त्यांच्या समोर आता सध्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून मंगळग्रह संस्थान प्रशासनाने त्यांना तात्काळ तेथे जागा देऊन दुकाने सुरू करू द्यावेत अशी मागणी होत आहे.
दरम्यान मंगळग्रह मंदिराचा विकासाचा फायदा हा अमळनेरकारांना रोजगार देण्यासाठी होईल की तेथील काही ट्रस्टी लोकांसाठीच होईल हा प्रश्न उपस्थित होतो.