आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय !
बोगस संस्थांच्या नावे महेंद्र बोरसेने लाटला शासनाचा निधी… सुरेश पाटील
कारवाई न झाल्यास सुरेश पाटलांचा १ मे रोजी उपोषणाचा इशारा
अमळनेर : आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय, या प्रमाणे अमळनेर येथील रेशन दुकानांचा विषय झालाय. सात्री येथील सरपंच तथा रेशन दुकानदार महेंद्र बोरसेने बंद पडलेल्या सेवाभावी संस्थांच्या नावे रेशन दुकान चालवून शासनाचा निधी हडप केल्याचे वरिष्ठांच्या चौकशीअंती निदर्शनास आले असून याप्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास १ मे रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश अर्जून पाटील यांनी दिले आहे.
अमळनेर तालुक्यात काही बोगस संस्थांच्या नावे रेशन माल उचलून शासनाची फसवणुक केली जात असल्याचे सुरेश पाटील यांना समजले असता त्यांनी महाराष्ट्र अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे तक्रारी केल्या. तक्रारीनुसार धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या चौकशीअंती तालुक्यात दोन संस्थाची मान्यता रद्द झाल्याचे आढळून आले. त्यात छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशीय मंडळ सात्री या संस्थेची मान्यता ५ मे २०१८ रोजी आणि निर्मलाई फाउंडेशन, सात्री या संस्थेची मान्यता २३ फेब्रुवारी, २०२२ रोजी मान्यता रद्द झाल्याचा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिलेले दिसून आले. तहसीलदारांच्या मागणीनुसार याबाबतचे पत्र सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगावचे अधिक्षक शक्तीकुमार पाटील यांनी ५ नोव्हेंबर, २०२४ रोजी दिले आहे. चौकशीत अमळनेर येथील रिद्धी सिद्धी महिला बचत गटदेखील निष्काषित केलेला आढळून आला असून या बचतगटाच्या सदस्या रिना विनोद बोरसे ह्या आहेत.
छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशीय मंडळ अंतर्गत आजही सात्री येथे दुकान क्रमांक १०१ तर निर्मलाई फाउंडेशन अंतर्गत मुडी येथे दुकान क्रमांक १११ सुरू आहे. तसेच रिद्धी सिद्धी महिला बचत गट अंतर्गत अमळनेर शहरात दुकान क्रमांक ४ येथे आजही रेशन दुकान सुरु आहे.
अमळनेर तालुक्यातील दोन संस्था व एक महिला बचतगट काही वर्षांपासून बंद असूनही रेशन माल उचलून शासनाचा लाखो रुपयांचा निधी हडप केला आहे. सुरेश पाटील यांनी पाठपुरावा करत एकप्रकारे अमळनेर तालुक्यातील बोगस रेशन दुकानांचा भांडाफोड केला असून या प्रकरणातील जबाबदार अधिकारी आणि व्यक्तींवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास १ मे रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सुरेश पाटील यांनी दिला आहे. या प्रकरणात पुढे नेमके काय होईल, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात एवढं जर होत असेल तर तहसीलदारांचे लक्ष कुठे आहे असा सवाल उपस्थित होत आहे.