या भागाचे आम्ही 150 वर्षांचे वारसदार… सेक्स वर्कर महिलांचा एल्गार

0

काही लोकांचा अट्टाहास आमची घरे हडप करण्यासाठीच… सेक्स वर्कर महिला

 

अमळनेर : सध्या तालुक्यात चर्चेचा विषय म्हणजे अमळनेर शहरातील वेश्या वस्ती आहे. कुणी म्हणतं शहरात ही वस्ती नको, हे बंद झालं पाहिजे तर कुणी म्हणतं की, यांना गावाबाहेर स्थलांतरीत करायला पाहिजे. आणि काहींचे म्हणणे आहे की, त्या महिला आहेत तर समाजातील काही लिंग पिसाट व पुरुषाच्या वेशातील जनावरांपासून महिला सुरक्षित आहेत. सगळी लोकं ही ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने मतं व्यक्त करीत असतात मात्र त्या महिलांच काय म्हणणं आहे, त्या कशा जगत आहेत, अमळनेर मधील वेश्या वस्ती आताच सुरू झालीये का ? असे अनेक प्रश्न अमळनेर मधील बुद्धिजीवी लोकांना सतावताय.

अमळनेर शहरातील वेश्या वस्तीतील महिलांची नेमकी परिस्थिती काय आहे ? व त्यांचे सगळे म्हणणे त्यांनी दिव्य लोकतंत्र सोबत व्यक्त केले आहे.

मराठी, हिंदी व इंग्रजीत अनेक भिन्न – भिन्न शब्दांनी ओळखल्या जाणाऱ्या या महिला अमळनेर शहरात देखील आहेत. इज्जतीची आव आणणारे, बाहेरून इज्जतदार व मधून राक्षसी वृत्ती असणाऱ्यांसाठी सेक्स वर्कर हे नाव उच्चारतो. तसे तर वेश्या, आणि आता लैंगिक कामगार /सेक्स वर्कर आशा व यांसारख्या अनेक नावांनी त्यांना ओळखले जाते.

सध्या शहरात जे सुरू आहे त्या वरून महिलांनी त्यांची बाजू मांडत त्या वस्तीचा इतिहास दिव्य लोकतंत्रकडे मांडला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सुमारे दीडशे वर्षांपासून आम्ही येथे आहोत म्हणजे आमचे पूर्वज याठिकाणी असायचे, या जागेवर आधी मुजरा हा कलाप्रकार चालत असे, कालांतराने मुजरा बंद झाला व नंतर त्याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू झाला. जुन्या काळात अमळनेर शहर हे दगडी दरवाज्याच्या पलीकडे होते, नंतर त्याचा अमळनेर शहराचा विस्तार वाढला व लोकं ह्या वस्तीच्या आजूबाजूला राहायला आली. व आज मोठ्या प्रमाणात येथे वस्ती आहे. अशाच प्रकारे आज आम्हाला दुसरी कडे जागा दिली व काही वर्षांनी तेथेही वस्ती आली आणि तेव्हाही आम्हाला तेथून स्थलांतरित केले जाईल. मग आम्ही कायम आमच्या हक्काच्या जागा सोडून निघायचेच का असे त्या महिलांनी म्हटले आहे.

सदर महिलांनी यासोबतच अनेक बाबी दिव्य लोकतंत्र समोर उघड केल्या आहेत. या महिलांना अनेक लोकं ती जागा खाली करण्यासाठी धमक्या देत आहेत. तर काही लोकं खंडणी मागत असून तुम्ही आम्हाला पैसे द्या तेव्हाच आम्ही तुम्हाला येथे राहू देऊ असे काही लोकं म्हणत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तर काही लोकं ही आमची येथील मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही म्हटले आहे.

दर तीन महिन्यांनी HIV टेस्ट होते….

रविवारी रियाझ मौलाना व इतर लोकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, अमळनेर तालुक्याच्या तुलनेत आमच्या भागातील HIV ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त असून सदर महिलांमुळे हे होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावरून सदर महिलांनी म्हटले आहे की, आमच्या वस्तीतील महिला 1 ते 3 महिन्यात HIV टेस्ट करीत असून शासकीय रुग्णालयातील आरोग्य टीम देखील येऊन नियमित तपासण्या करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

वाचा ही देखील व्यथा…

अनेक वेळेस आम्हाला खाण्यासाठी राहत नाही. माणसांच्या वेशात आलेले राक्षस आमचे लचके तोडतात, अनेक शारीरिक अत्याचार करतात, समाजात राहणाऱ्या लिंगपिसाट व नराधम लोकांपासून महिलांना खूप धोका असून आमच्यामुळे तो धोका टळतो व महिलांवर होणारे अत्याचार तसेच बलात्कार कमी होतात, सध्याच्या काळात कमी वयाच्या मुलींना व म्हाताऱ्या महिलांना देखील हे नराधम सोडत नाहीत, त्यांच्यावरही बलात्कार होतात मात्र हे प्रसंग आमच्यामुळे काही ठिकाणी घडत नाहीत असेही या महिलांचे म्हणणे आहे.

दरम्यान आमची ही वस्ती सुमारे दीडशे वर्षांपासून येथे असून हे सोडून आम्ही कुठंही जाणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!