वेश्यावस्तीचे स्थलांतर करा….
पत्रकार परिषदेतुन सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी, पोलीस प्रशासन तसेच प्रांताधिकारी यांच्यावरही लावले आरोप
अमळनेर : शहरात अनेक वर्षापासून गांधलीपुरा या रहिवासी वस्तीत वेश्या वस्ती असून त्याचे तात्काळ स्थलांतर करा अशी मागणी रविवारी अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन व अमळनेर प्रांताधिकारी यांच्यावर देखील आरोपांच्या गोळ्या झाडल्या.
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात जुन्या काळापासून वेश्या व्यवसाय करण्यासाठी काही घरांमध्ये वेश्यागृह चालविले जात आहेत, तर त्यांचा वापर काही महिलां द्वारे व्यापार करण्यासाठी केला जात आहे. यामुळे स्थानिक सामान्य जनतेला उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत जिल्हा व तालुका प्रशासन सह पोलीस विभागाला गांभीर्य नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते. तर पोलीस प्रशासन हे वेश्याव्यवसायातील दलाल तसेच वेश्याव्यवसाय चालवणारे यांच्याशी मॅनेज असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. तर महिला दिनी प्रांताधिकारी यांनी त्या महिलांच्या कार्यक्रमात म्हटले की, त्या महिला हा व्यवसाय स्वखुशीने करू शकतात असे प्रांताधिकारी म्हटले असल्याचाही आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
अनेक वर्षापासून अमळनेर शहरातील नागरिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी पुढाकार घेऊन सदरची वैश्या व्यापार बंद व्हावे किंवा सदरची वस्ती शहरा बाहेर स्थलांतर करावे म्हणून अनेक आंदोलने केली. परंतु वेश्याग्रह व वेश्याद्वारे व्यापार पूर्णपणे बंद झालेला नाही. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे गृह विभागातील अधिकारी व जिल्हा प्रशासनाविरुद्ध क्रिमिनल पीटिशन 598/2019 दाखल केले होते. त्यात सदस्यीय बेंचने दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी ऑर्डर केली होती. त्या ऑर्डरची अंमलबजावणी व्हावी ही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी 7 मार्च 2025 रोजी अमळनेर शहरातील सर्व सामाजिक, शैक्षणिक संघटना व कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून भव्य मोर्चा काढण्यात आला.
खालील बाबींचा प्रशासनाने व पोलीस विभागाने गांभीर्याने विचार करावा असे त्यांनी म्हटले आहे.
1) पीडित व याचिका करते/ आंदोलन कर्त्यांना वेश्यागृह चालकाकडून धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे.
2) पोलीस अधिकाऱ्यांनी या परिसरात गस्त घालून वेश्या गृह, वेश्या व्यापार बंद करावा, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
3) अमळनेर नगरपरिषदेने या परिसरात कार्यक्षम सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.
4) जळगाव जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी वेश्यागृह चालविणाऱ्यांचे समुपदेशन करावे व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी व पर्यायी अन्य व्यवसाय करावयास मार्गदर्शन व मदत करावी.
(5) कॉलेजच्या अविवाहित मुला मुलींना वेश्यागृह चालविणाऱ्या महिला खोली, जागा उपलब्ध करून देतात व त्यांच्याकडून पैसे वसूल करतात.
6) अल्पवयीन मुलींना जबरदस्ती आणून वेश्याव्यवसाय करायला भाग पाडले जाते.
7) भरवस्तीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याने, आजूबाजूला राहणाऱ्या लहान मुला, मुलींवर त्याचा विपरीत परिणाम होतो. रात्री बे रात्री वेश्याव्यवसाय न करणाऱ्यांचे दरवाजे ठोकले जातात.
8) वेश्याव्यवसाय करणाऱ्यांची 30 घरे आहेत. या परिसरात सरकारी दवाखाना.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, मस्जिद आहे. सप्तश्रृंगी मंदिर आहे, शाळा आहे अशा भरवस्तीत ही वेश्या ग्रह चालविली जातात.
9) एड्स ची लागन याच वस्तीच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर होत असते.
10) गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले जाते. गुन्हेगारांना संरक्षण मिळते. गांजा, नकली दारू, भांग इत्यादी अवैध व्यवसाय याच परिसरात चालतात त्यामुळे महिला व मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे.
11) आतापर्यंत पीटा अंतर्गत किती कारवाया झाल्या याची माहिती पोलीस प्रशासनाने द्यावी.
12) या वस्तीतील कुटुंबातील मुला मुलींची लग्न होत नाही. याचा गंभीरपणे प्रशासनाने विचार केला पाहिजे.
13) लग्न झालेल्या कुटुंबांचे घटस्फोट” रेड लाईट “एरियात राहतात यावरून होत आहेत.
14) वेश्यागृह चालविणाऱ्या महिला लखोपती आहेत त्यांची मुंबई, पुणे, न्यु पॅलाट, गलवाडे रोड, कॉटन मार्केटच्या मांगे, शहा आलम नगर, श्रद्धा नगर, इत्यादी ठिकाणी घरे आहेत. त्यामुळे
व्यक्तिगत पातळीवर त्या व्यवसाय करीत नाहीत त्या वेश्यागृह चालवितात व वेश्या व्यापार करतात.
15) वेश्यागृह, वेश्या व्यापार ज्या ठिकाणी चालतो त्या एरियातील लोकांच्या मतांना, भावनांना काही किंमत नाही का ? कोणत्याही वस्तीत हा व्यवसाय करता येईल का?
16) एका वीस वर्षाच्या मुलीने सांगितलेला अनुभव अस्वस्थ करणाराआहे ती म्हणते,” मला सायंकाळी 7 नंतर घराबाहेर पडता येत नाही माझ्या मित्र, मैत्रीणींना माझ्या घरी बोलवता येत नाही मला माझे राहते घर सोडावेसे वाटते.
17) रहिवाशी वस्तीतून वेश्या गृह, वेश्या व्यापार हद्दपार करावा.
विशेष बाब म्हणजे या वैश्या व्यवसाय मधून मलिदा खाणाऱ्या काही गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवक – लोकप्रतिनिधीनी प्रशासन व सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून अमळनेर शहरात महिला मेळावे घेऊन त्यात प्रशासकीय अधिकारी यांना आमंत्रित केल्याने सदरच्या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वक्तव्यामुळे समाजात. संभ्रम निर्माण झाला आहे. एक प्रकारे या कार्यक्रमामुळे मा उच्च न्यायालयाच्या आदेशाला कानाडोळा करीत आदेशाची पायमल्ली केल्याची भावना आम्हा आंदोलन कर्त्यांची झाली आहे. त्यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटना वरील मुद्दे समाजापर्यंत घेऊन जाऊन जनतेचे प्रबोधन करणार आहोत आणि नंतर आंदोलनाचे टप्पे ठरवणार आहोत असे आम्ही या पत्रकार परिषद द्वारे जाहीर करीत आहोत..!
यावेळी रियाज मौलाना, अशोक पवार, संदीप घोरपडे भागवत सूर्यवंशी आदी उपस्थित होते