हजेरीच्या जाचक अटींमुळे कामगार त्रस्त…
अमळनेर नप प्रशासनाने अनेक हजेरी पद्धत बंद करून एक हजेरी पद्धत सुरू करावी…
अमळनेर : नगर परिषदेच्या कामगारांसाठी सध्या अनेक हजेरी पद्धत सुरू झाली असून यामुळे कामगार त्रस्त झाले आहेत. हजर – गैरहजर हजेरी, सही घेऊन हजेरी तर आता नवीन अमलात आलेली चेहरा ओळखत पटवून ऑनलाइन ऍपद्वारे घेतली जाणारी हजेरी असे तीन हजेरी प्रकार अमळनेर नगर परिषदेत सध्या सूरु आहेत. कामगारांवर अनेक हजेरी प्रकार लादणारी अमळनेर नगर परिषद ही महाराष्ट्रात पहिली नगर परिषद असावी. या हजेरी प्रकारातील शेवटच्या हजेरी पद्धतीत तर दिवसातून चार वेळेस चेहरा दाखवून हजेरी लावावी लागते असे कामगारांचे म्हणणे आहे. आता कामगार काम करतील की, हजेरीच लावत फिरतील असे अनेकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने दिलेली कामे झाली नाहीत तर ती वेगळी कारवाई कामगारांवर केली जाते. सकाळी 6 वाजता उठून काम सुरू करणारे लोक जगात कुठंच नसतील मात्र कामगार सकाळी 6 वाजता उठून काम सुरू करतात.
कामगारांना किट नाही मग ऍप वर खर्च का ?
सध्याच्या काळात बांधकाम कामगारांपासून तर इतर सगळ्या कामगारांना सुरक्षा किट द्यावे असे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. मात्र अमळनेर नगर परिषदेच्या कामगारांना सुरक्षा किट नाही,अमळनेर शहराच्या नाल्या, रस्ते यांसह सगळीच स्वच्छता ठेवणाऱ्या या कामगारांना सुरक्षा का नाही असा सवाल उपस्थित होतो. त्यांना सुरक्षा किट न देता उलट त्यांना अशा प्रकारे त्रास देणे हे कितपत योग्य म्हणावे ? असाही सवाल उपस्थित होतो. आणि जर किट देण्यासाठी व कामगारांचे वेळेवर पगार करण्यासाठी नप प्रशासनाकडे पैसे नसतील तर ऍप बनवून त्यावर खर्च का करावा असे सवाल अनेक कामगारांनी दिव्य लोकतंत्रकडे उपस्थित केले आहेत.
नगर परिषदेतील अनेक कामगार अशिक्षित आहेत तर काहींकडे मोबाईल नाहीत. अशात आपल्या मोबाईल मध्ये स्वतः चेहरा ओळख देऊन हजेरी लावणे अशिक्षित कामगाराला समजत नाही. व ज्यांच्या कडे मोबाईल नाही त्यांनी काय करावे ?
ऍपद्वारे हजेरी जमत नाही म्हणून अनेक कामगार गैरहजर
अशिक्षित असल्याने मोबाईल जमत नाही किंवा ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशा अनेक कामगारांना गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावता न आल्याने गैरहजर दाखवले गेले आहे. मोबाइल ऍप जमत नाही किंवा त्यांच्याकडे मोबाईल नाही ही कामगारांची चूक म्हणता येणार नाही. म्हणून वरील सर्व विषय लक्षात घेता ही हजरी पद्धत तात्काळ बंद करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.