9 रोजी सकल बहुजन समाजाचा अमळनेरात मोर्चा
प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमळनेर : नागपूर येथील प्रशांत कोरटकर या इसमाने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि माँ जिजाऊ यांच्याबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याने. या वक्तव्यामुळे शिवप्रेमी आणि बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असून, या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आणि प्रशांत कोरटकरवर तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अमळनेर तालुक्यातील सकल बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनी ३ मार्च २०२५ रोजी अमळनेर पोलीस स्टेशन गाठले. मात्र, प्रभारी पोलीस निरीक्षक केदार बारबोले यांनी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. लेखी स्वरूपात नकार देण्याची मागणी केली असता त्यांनी तसेही करण्यास नकार दिला.
यामुळे बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनी पोलीस स्टेशनच्या बाहेर शांततेत तीन तास आंदोलन केले. त्यानंतर, डीवायएसपी साहेबांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. मात्र, पोलीस अधीक्षकांकडून देखील ठोस लेखी हमी न मिळाल्याने बहुजन समाजाने अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर, रविवार, ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता अमळनेर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार असून, मंगलमूर्ती चौक, कचेरी रोडमार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा पोहोचेल. याची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
सदर मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांवरील असिम श्रद्धेमधून आणि बहुजन समाजाच्या न्यायाच्या मागणीसाठी आयोजित केला आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.