पारोळा – एरंडोल मतदार संघात महायुतीमध्ये तिघांचा बंड…
अमोल पाटलांना निवडणूक लढणे जड जाणार ?
पारोळा : पारोळा – एरंडोल मतदार संघात महायुती मध्ये तिघांनी बंड केला असून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचा मुलगा अमोल पाटील यांना निवडणूक लढणे चांगलेच जड जाणार असल्याची चिन्हे आहेत. यात महायुती मध्येच नाही तर शिवसेना पक्षात देखील दूसरा व्यक्ती बंड करून अपक्ष उमेदवारी करणार आहे.
अमोल पाटील यांना काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र यामुळे मतदार संघातील बरेच लोकं नाराज झाली होती. याचे पडसाद महायुतीमध्ये देखील दिसत असून आता सरळ महायुतीमध्येच इतर तीन लोकं बंड करण्याच्या तयारीत आहेत. तर त्यांची सध्या तयारी देखील जोरदार सुरू असून प्रचार सुरू झाला आहे.
माजी खासदार ए. टी. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस समझोता करत माघार घेतली होती तर आता विधानसभा निवडणुक लढण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ऐन वेळेस राजतीलक करण्याजोगे चिमणराव पाटील यांचे वारसदार अमोल पाटील यांना ऐन वेळेस तिकीट दिल्याने ए. टी. पाटील हे नाराज असल्याचे समजते. म्हणून ते आता अपक्ष निवडणूक लढणार असून महायुती मधून बंड करणार आहेत.
तर पारोळा येथीलच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात असलेले डॉ. संभाजी पाटील हे देखील अपक्ष निवडणूक लढणार आहेत. ते सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असे समजते.
व एरंडोल येथील भगवान महाजन हे देखील शिवसेना पक्षात असून ते देखील बंड करत अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल झाला आहे. म्हणून यावेळी अमोल पाटील यांना निवडणूक लढणे चांगलेच जड जाणार असून जिंकणे अवघड जाण्याची चिन्हे आहेत.