कुणावर अन्याय होणार नाही व दोषींना पाठीशीही घातले जाणार नाही
आपले अमळनेर आपल्याच सांभाळायचे आहे… डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांचे भावनिक आवाहन
अमळनेर : शहरात गेल्या काही दिवसांपासून जातीयतेढ निर्माण होईल अशा अनेक हालचाली घडत आहेत. काही लोकांकडून ही कृत्य होत असल्याने अमळनेरची शांतता व सुव्यवस्था खराब होईल अशी परिस्थिती सध्या अमळनेरात आहे. म्हणून काल शनिवारी अमळनेर पोलीस प्रशासनाने पत्रकार परिषद घेतली होती. यातून अमळनेरकरांनी शांतता राखावी व खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
अमळनेर ही संतांची भूमी आहे मात्र सध्या अमळनेर तालुक्यात काही लोकं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा गैरकृत्य करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही व जे दोषी नाहीत त्यांच्यावर अन्याय देखील होणार नाही, तसेच अमळनेर आपले असून त्याला आपल्यालाच सांभाळायचे आहे असे भावनिक आवाहन शनिवारी पत्रकार परिषदेत अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी अमळनेरकरांना केले आहे.
गुन्ह्यात अडकलेल्या तरुणांवर काय परिस्थिती येत असते याचे उदाहरण देत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर म्हणाले की, अमळनेर शहरातील एका तरुणावर अशाच प्रकारचा गुन्हा होता, मात्र तो पोलीस भरतीची तयारी करीत असल्याने त्याची आता राज्य राखीव पोलीस दलात निवड झाली आहे. त्यावर असलेल्या एका गुन्ह्यामुळे त्यास सध्या कागदपत्रे पडताडणीत खूप अडचणी येत आहेत. म्हणून तरुणांनी आपल्या पुढील जीवनाचा विचार करूनच अशा गैरकृत्यात सहभागी व्हावे असेही त्यांनी म्हटले आहे.