दृष्टीहीन कलाकारांची कला अमळनेरकर अनुभवणार…
दिनांक 26 रोजी होणार भव्य कार्यक्रम
अमळनेर : दृष्टीहीन कलाकारांची कला अमळनेरकर जनता अनुभवणार असून दिनांक 26 सप्टेंबर रोजी इंदिरा भुवन अमळनेर येथे एक अद्वितीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चेतना मेलोडी ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून राज्यभरातील दृष्टिहीन कलाकार आपल्या कलेचे दर्शन देणार आहेत. अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट (महाराष्ट्र राज्य)च्या वतीने होणाऱ्या या ऑर्केस्ट्रा च्या कार्यक्रमातून दृष्टिहीन कलाकारांच्या कौटुंबिक खर्चाची पूर्तता केली जाते, म्हणून एक सामाजिक जाण असणाऱ्या लोकांनी कार्यक्रमास मदत करावी असे आवाहन अंध अपंग संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
विविध कलाकारांची झलक
या कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम तथा प्रसिद्ध कलाकार प्रविण पाटील, अनेक पुरस्कार प्राप्त पूजा शेंद्रे, दुर्गा गवई, निर्मला शिरसाठ शहादा, पुष्पराज पवार, कमलाकर कुंभार, प्रविण पाटील, विनय वाघ, चंद्रकांत मैलागीर तसेच अनेक कलाकार आपले प्रतिभावान सादरीकरण देणार आहेत.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दृष्टिहीन कलाकारांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कौटुंबिक परिस्थिती सुधारणे हा आहे. तसेच, समाजात दृष्टिहीन व्यक्तींबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा देखील एक महत्त्वाचा हेतू आहे म्हणून हा कार्यक्रम केवळ मनोरंजनच नाही तर एक सामाजिक जबाबदारीही आहे. आपल्या उपस्थितीने आपण या कलाकारांचे मनोबल वाढवू शकतो. तसेच, विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी या कार्यक्रमात आर्थिक मदत करून या कार्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्टचे सेक्रेटरी तात्या पानपाटील यांनी केले आहे.