गावात आता माणसं राहत नाहीत,जाती राहतात… भीमराव महाजन
दिव्य लोकतंत्र विशेष : दोन दिवसापूर्वी खूप दिवसातून गावाकडे गेलो होतो.पण माझं गाव आता मला माझं गाव दिसून येत नव्हत. माझं गाव आता जातीच्या पोत्यान भरलेलं दिसत होत. गावातील जिवाभावाची मित्र जाती जातीच्या गटा गटात उभा होती. दुकानात सुद्धा,आप आपल्या जातीच्या दुकानात जातीचीच लोक. काही दुकानं तर बहिष्कार टाकल्यात जमा. आज पर्यंत मी माझ्या समाजात कमी आणि मराठा समाजात जास्त वावरणारा. मराठा समाजातील मित्रांचा कोणताही कार्यक्रम असला की हजर. गावातील सगळे कार्यक्रम माझ्याच नियोजनातून घेणारे मित्र. आज तेच मित्र डोळे मोठे करून बघण्याच्या पलीकडे,बोलायला सुद्धा तयार नाहीत. मला पाहून माझ्याकडे पाट करुन उभा राहत होती.
महाराष्ट्रभर शिवराय ते भीमराय यांचे विचार सांगत फिरणारा मी. आज माझ्यासोबत त्यांचे विचार सोडून कोणीच बोलायला तयार नाही…!
हाच महाराष्ट्र एकेकाळी जातीअंताची हाक देत होता.तोच महाराष्ट्र आता जात अभिमानाची हाक देत आहे. फुले शाहू आंबेडकर यांनी जाती-जाती शिवून काढल्या.त्या मात्र आता ऊसवायला लागल्या आहेत हे मात्र नक्की. कुणी कोणत्या जातीत जन्माला यायचं हे आपल्या हातात नाही.पण आज मात्र मी ज्या जातीत जन्माला आलोय ती माझी चूक आहे का ? असा सवाल मात्र येत होता. तेवढ्यात एक माझा मराठा मित्र मला बोलला.ते ही जातीच्या नजरेतूनच “आला भो भुजबळांचा माणूस..” मी म्हणालो,”फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नंतर भुजबळ साहेबांशिवाय आम्हाला आहे तरी कोण..!
प्रत्येकाला आपल्या हक्काविषयी लढण्याचा अधिकार आहे. कुणी आपले हक्क अधिकार हिसकाऊन घेत असेल तर त्या विरोधात आवाज उठविणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे.
भिमराव महाजन – सामाजिक कार्यकर्ते
फुले शाहू आंबेडकर विचारांचे प्रचारक