शेवटी कृषिभूषण साहेबराव पाटील सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात अनुपस्थित…
काय आहे कारण ?
अमळनेर : मागील महिन्यापासून उमेदवारीसाठी चर्चेत असणारे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे अमळनेर मतदार संघाच्या राजकारणात महत्त्वाचे नाव आहे. ते मागील काही महिन्यांपासून राजकारणापासून दूर होते. त्यांची उमेदवारीची चर्चा सुरू झाली, व त्यानुसार त्यांची तयारी सुरू झाल्यानंतर अनेक राजकिय लोकांनी त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला.
मंत्री अनिल पाटील व कृषिभूषण साहेबराव पाटील यांची भेट घेतली. त्यांची पहिली भेट धुळ्यात झाली आणि मतदार संघात चर्चांना उधाण आले. तर दुसऱ्या दिवसाच्या भेटीनंतर अनेक लोकांनी साहेबराव पाटील यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र दिनांक 12 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अमळनेर दौऱ्या दरम्यान कृषिभूषण पाटील यांनी भेट घेणे टाळले व मतदार संघातील चर्चांना वेगळे वळण आले.
कृषिभूषण पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणे टाळल्या नंतर अनेक चर्चा अमळनेर मतदार संघात झाल्या, त्यात साहेबराव पाटील हे उमेदवारी करणारच आहेत पण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार की अपक्ष ही चर्चा सुरू झाली. तर साहेबराव पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी करतील अशीही चर्चा जोर धरू लागली होती.
मात्र कृषिभूषण पाटील हे शनिवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यादरम्यान होणाऱ्या शिवाजी महाराज नाट्यगृहातील सभेत देखील अनुपस्थित राहिले व त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी बाबत देखील पूर्णविराम दिलाय की काय असा प्रश्न निर्माण होतो.
साहेबराव पाटील यांची अनुपस्थितीचे काय आहे कारण ?
माजी आमदार कृषिभूषण पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी जळगाव येथे भेट घेतली. त्यानंतर ते तुतारीचे उमेदवार असल्याचे म्हटले जात होते. मात्र पुन्हा शनिवारी कृषिभूषण पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात अनुपस्थिती दिल्याने त्यांच्या बद्दल चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
मात्र यावर कृषिभूषण पाटील यांनी म्हटले आहे की, रावेर, पारोळा, जळगाव ग्रामीण येथील उमेदवार ठरू शकतात तर अमळनेरचा का नाही, अमळनेर हे महाराष्ट्रातील महत्वाचे मतदारसंघ आहे. व मंत्र्यांचा मतदार संघ असल्याने येथे लवकर उमेदवार ठरणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जर ही जागा जिंकायची असेल तर मग एवढा वेळ वाया का घालवताय, व जर स्थानिक पदाधिकाऱ्यांना खरंच पक्षाची तळमळ आहे, तर हे स्वतःचे आत्मपरीक्षण करून माघार का घेत नाहीत असाही सवाल त्यांनी दिव्य लोकतंत्रशी बोलतांना उपस्थित केला आहे. वेळ आल्यावर आपण २००९ घडवू असेही सूचक विधान कृषिभूषण पाटील यांनी दिव्य लोकतंत्रशी बोलतांना केले आहे.