अमळनेरसाठी शरद पवार इन ऍक्शन मोड…
दोन पुढाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश
अमळनेर : विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे इन ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे पुढारी व संभाव्य उमेदवार यांच्या बैठकी घेण्यास शरद पवार यांनी सुरुवात केली आहे.
मंत्री अनिल पाटील यांनी अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीतुन बंड करत भाजपा व शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवला होता. तर त्याच्या काही दिवसांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हटले होते की, “पुढच्या विधानसभेत अनिल पाटील दिसणार नाहीत.” व आता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला गेले असता “मला कुठल्याही परिस्थितीत अमळनेर जिंकायचे आहे” असे शरद पवार यांनी म्हटले असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले आहे.
तर आता गेल्या दोन दिवसांपासून अमळनेर येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुढारी व संभाव्य उमेदवार यांच्या बैठका व भेटी बारामती तसेच इतर ठिकाणी शरद पवार यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. यात राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. उमेश पाटील यांची दिनांक ४ व ६ रोजी भेट झाली असून त्यांनी शरद पवार यांच्या सोबत स्नेह भोजन देखील केले असल्याचे समजते. व त्यांना कामाला लागा असेही पवार यांनी सांगितले असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले आहे. तर कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी देखील गेल्या दोन दिवसात शरद पवार यांची भेट घेतली असून माजी आमदार पाटील यांनाही तयारीला लागण्याचे सांगितले असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान शरद पवार व या दोन्ही लोकांच्या भेटीची जोरदार चर्चा मतदार संघात सुरु आहे. म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आगामी विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार असणार हा प्रश्न अजून तरी गुलदस्त्यात आहे.
शरद पवार साहेब व माझी दिनांक ४ व ६ जुलै रोजी भेट झाली असून साहेबांनी मला तयारीला लागण्याचे सांगितले आहे.
उमेश पाटील, प्रदेशाध्यक्ष – ग्रंथालय सेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
या बाबत सध्या काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. वेळेवर सगळी माहिती देऊ.
कृषिभूषण साहेबराव पाटील – माजी आमदार, अमळनेर