अमळनेर नगर पालिकेचे पाणीपुरवठासाठी ढिसाळ नियोजन
अनियोजित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त
अमळनेर : नगर परिषदेने गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत ढिसाळ नियोजन केले असून सध्या शहराला अनियोजित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.
या बाबत वृत्त असे की, अमळनेर नगर परिषदेचा पाणी पुरवठा उन्हाळ्यामुळे ढिसाळला होता. उन्हाळ्या आधी नगर पालिकेने नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र ते नियोजन न करता अमळनेरच्या नागरिकांना अडचणीत टाकण्याचे काम नगर परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले. उन्हाळा असल्याने नागरिकांनी देखील समजून घेतले व एखादं दोन ठिकाणी सोडून इतर कुठंही नागरिकांनी आंदोलने अथवा मोर्चा केला नाही. मात्र पावसाळा सुरू होऊन महिना झाला व सुदैवाने अमळनेर तालुक्यावर यावर्षी वरुणराजा मेहरबान असला तरीही नगर परिषदेला पाणीपुरवठा सुरळीत करता आला नाही. आणि याचा फटका सर्वसामान्य अमळनेरकर नागरिकांना बसत आहे. यापूर्वी नगर परिषदेमार्फत काही ठिकाणी सामूहिक नळ सुरू होते मात्र सध्या ते देखील बंद असल्याने नागरिकांनी आता पाणी आणावे कुठून हा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून नगर परिषदेने आपले ढिसाळ नियोजन सुधारून पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ववत करावा हीच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.