उड्डाणपूलास मान्यता, मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने भुयारी मार्ग झाल्याने नागरिकांना होतोय नाहक त्रास कृषिभूषण पाटील यांची लोकप्रतिनिधींवर टीका
तर रेल्वे भुयारी मार्गांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रेल्वे प्रशासनाकडून पाणी निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाय – योजना कराव्यात – कृषिभूषण साहेबराव पाटील
अमळनेर : तालुक्यासह धरणगाव तालुक्यातील अमळनेर तालुक्यास आवश्यक असलेले दोन रेल्वे उड्डाणपूलांना २०१४ साली केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील रेल्वे उड्डाणपूलच्या सुमारे ७०९ प्रकल्पांना पुढील कारवाईसाठी मंजुरी दिली होती. त्यासाठी ६२३३ रुपयांचा खर्च लागणार होता. व तसा प्रस्ताव केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे मंजुरीसाठी पाठविण्यात देखील आलेला होता.
या प्रस्तावास नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारच्या ७०९ कामांसाठी रुपये ६२३३ कोटी च्या कामांच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता दिलेली होती. व त्या ७०९ कामांपैकी कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या लेखी मागणीनुसार अमळनेरच्या कामी येणाऱ्या २ कामांचाही समावेश होता. त्यातील धरणगाव – टाकरखेडा – अमळनेर यासाठी ३० कोटी रुपये व धरणगाव – राजवड – पारोळा म्हणजे धरणगाव – ढेकू – सारबेटे – हेडावे मार्गे अमळनेर या कामासाठी ३३ कोटी, ३४ लाख, ३८ हजार एवढ्या कामांना तत्वतः मान्यता देण्यात आली होती. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने वरील दोन्ही ठिकाणी उड्डाणपुल (ROB) ऐवजी रेल्वे भुयारी बोगदा (RUB) तयार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत पावसामुळे त्या बोगद्यांमध्ये पाणी साचत असल्याने प्रवाश्यांना व वाहन धारकांना त्रास होत असून किरकोळ अपघात होत आहेत. या बोगद्यांची समस्या कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रेल्वे प्रशासनाकडून पाणी निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी आदेशीत करावे, अशी मागणी नागरिकांकडून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.
मी आमदार असतांना अमळनेर तालुक्याला उपयुक्त असे दोन रेल्वे उड्डाणपूल व्हावेत अशी मागणी मी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती. व त्या दोन्ही कामांना केंद्र सरकारने तत्वतः मान्यता देखील दिली होती. मात्र २०१४ नंतर माझा कार्यकाळ संपला व त्यानंतर लोकप्रतिनिधीनी याकडे दुर्लक्ष केले व मंजूर असलेल्या उड्डाणपूलाच्या जागी आज तेथे भुयारी मार्ग झाल्याने प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष द्यावे.
कृषिभूषण पाटील – माजी आमदार,अमळनेर विधानसभा