संत सखाराम महाराज व सानेगुरुजी यांच्या भूमीत दोन दिवसांपासून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न….
कायदा सुव्यवस्था खराब होण्यापूर्वी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज
अमळनेर : हे संत सखाराम महाराज व सानेगुरुजी यांचे शहर म्हणून ओळखले जाते. सखाराम महाराज व सानेगुरुजी यांच्यासह अमळनेर शहरात अनेक लोकं होऊन गेलीत ज्यांच्यामुळे अमळनेरचे नावलौकिक आहे. आणि हे शहर शांत शहर आहे या शहरात सर्व समाज एकत्र व आनंदाने नांदत असतात, या अमळनेरकारांच्या मनात कुठलाही जातीयवादाचा मळ नाही मात्र गेल्या दोन दिवसांपासून काही समाजकंटकांकडून अमळनेरची शांतता भंग करण्याचे कट कारस्थान सुरू असून अमळनेरकारांच्या मनात जातीयतेचा मळ घालण्याचा घाट काही समाजकंटक करीत आहेत.
रविवारी रुबजी नगर भागात असणाऱ्या एका समाजाच्या धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली होती तर लगेच सोमवारी पैलाढ भागातील एका समाजकंटकाने एका जातीबद्दल अभद्र भाषेचा वापर करत इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमावर पोस्ट व्हायरल केली. रविवारची घटना ताजी असतांना लगेच सोमवारी अशी घटना घडणे ही बाब अत्यंत चुकीची आहे.
रुबजी नगर भागात असणाऱ्या एका समाजाच्या धार्मिक स्थळाची तोडफोड करणारा आरोपी महेंद्र भोई याला व सामाजिक माध्यमांवर एका समाजाबद्दल अभद्र भाषेचा वापर करणाऱ्या स्वप्नील पाटील या दोघांना अमळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अटक केली आहे. ही बाब प्रशंसनीय असून अमळनेरकरांसाठी अभिमानाची देखील आहे की, अमळनेरचा कायदा सुव्यवस्था चांगल्या हातांमध्ये आहे.
मात्र ह्या घटना घडायला नको यासाठी प्रशासनाने विविध ठिकाणी मोठ्या बैठका घेऊन इतर उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे. जेणेकरून हे – जे काही समाजकंटक आहेत ते लगेच शांत होतील. अन्यथा काही महिन्यांवर निवडणूका असल्याने राजकिय लोकं त्यांची पोळी भाजतील व बोट प्रशासनाकडे दाखवतील हे नक्की !