अमळनेरच्या केसरअलीने घेतली 10 लाखांची सुपारी

0
IMG-20260905-WA0029

सुरतच्या बिल्डर हत्या प्रकरणात अटक; इतर तिघांचाही समावेश 

 

अमळनेर : सुरत शहरातील चौक जहांगीर ब्रिजवर 31 ऑगस्टच्या रात्री बिल्डर फैजल जकरिया हसन याची धारदार हत्याराने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या हत्येचा तपास करताना चौक बाजार पोलिस आणि सुरत क्राइम ब्रांचला मोठे यश मिळाले असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमळनेर येथील केसरअली आबीदअली सैय्यद याचा समावेश आहे. याशिवाय अभिषेक / गुंगरू, वसीम /वसियो, गोकुळ संतोष जाधव असे धुळे, जळगाव आणि सुरत येथील प्रत्येकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या तपासात या हत्येमागे सुपारीचा कट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुबारक उर्फ मुन्ना मजीद पटेल याने कथितरित्या फैजल जकरिया हसन याच्या हत्येसाठी तब्बल 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. या सुपारीच्या रकमेतून 1 लाख रुपये टोकन म्हणून आरोपींना देण्यात आले होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

हत्येनंतर मुंबईच्या दिशेने पलायन

फैजल याची हत्या केल्यानंतर आरोपींनी सुरत शहरातून तातडीने पलायन केले. आरोपी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर चौक बाजार पोलिस आणि सुरत क्राइम ब्रांचच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला.

पोलिसांनी या तपासासाठी घटनास्थळावरील तसेच आरोपींच्या संभाव्य मार्गावरील CCTV फुटेज तपासले. त्याचबरोबर तांत्रिक सर्व्हिलन्स आणि ह्युमन सोर्सच्या माध्यमातून आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात आला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

मुंबई हायवेवर चौघांना पकडले

तपासादरम्यान आरोपी मुंबईच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा माग काढत मुंबई हायवे परिसरात कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये अमळनेरचा केसरअली आबीदअली सैय्यद, तसेच धुळे, जळगाव आणि सुरत येथील प्रत्येकी एका आरोपीचा समावेश आहे.

या कारवाईमुळे सुरत शहरात घडलेल्या या खून प्रकरणाचा उलगडा होण्यास महत्त्वाची मदत झाली आहे. आरोपींमध्ये नेमकी कोणाची काय भूमिका होती, हत्येचा कट कुठे आणि कसा रचण्यात आला, तसेच सुपारी देण्यामागील कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, सुपारीची संपूर्ण रक्कम कधी आणि कुठे देण्यात आली तसेच हत्येमागील नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतर या हत्याकांडाबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!