राजीनाम्याचा फुसका बार! घोषणा होऊन दीड महिना उलटला, तरी ‘राजीनामा’ कुठे आहे?

0
IMG-20260805-WA0021

सभापती अशोक पाटील यांच्या राजीनाम्याच्या घोषणेची जोरदार चर्चा

प्रत्यक्ष राजीनामा मात्र अद्याप गुलदस्त्यात! ‘तारीख पे तारीख’मुळे बाजार समितीच्या राजकारणात चर्चांना उधाण

 

 

 

अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा झाली… बातम्या प्रसिद्ध झाल्या… राजकीय चर्चांना उधाण आले… इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या… मात्र राजीनामा काही दिसेना! त्यामुळे आता अमळनेरच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चेत आहे—“राजीनामा नेमका दिला कधी जाणार?”

सन २०२३ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. त्यानंतर अशोक पाटील यांच्याकडे सभापतीपदाची जबाबदारी आली. सभापतीपद एकाच व्यक्तीकडे कायम न ठेवता पक्षातील इतरांनाही संधी मिळावी, याबाबत पक्षांतर्गत चर्चा असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. कालांतराने अशोक पाटील यांनी एक वर्षानंतर राजीनामा द्यावा, अशी मागणीही दबक्या आवाजात सुरू झाली.

मात्र त्यानंतर घडले ते अधिकच रंजक!

“मी राजीनामा देतोय” अशी घोषणा स्वतः सभापती अशोक पाटील यांनी केली आणि त्याची प्रसिद्धीही झाली. त्यामुळे आता बाजार समितीला नवा सभापती मिळणार, अशी अपेक्षा निर्माण झाली. इच्छुकांच्या राजकीय गणितांना वेग आला. समर्थक-कार्यकर्त्यांच्या चर्चांना उधाण आले. मात्र दिवस गेले, आठवडे गेले आणि आता महिन्याभरापेक्षा अधिक, जवळपास दीड महिना उलटून गेला… तरी राजीनामा मात्र अद्याप कागदावर उतरल्याचे दिसत नाही!

घोषणा एवढी मोठी, पण राजीनामा कुठे?

राजीनामा देण्याची घोषणा झाल्यानंतरही प्रत्यक्ष राजीनामा सादर होत नसेल तर घोषणेचा अर्थ काय, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. राजीनामा देण्याची तारीख ठरली होती की केवळ घोषणा करण्यापुरतीच घोषणा होती? असा प्रश्नही बाजार समितीच्या वर्तुळात विचारला जात आहे.

राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर एवढा मोठा कालावधी उलटूनही निर्णय प्रत्यक्षात न आल्याने आता राजकीय चर्चांना खतपाणी मिळाले आहे. “राजीनामा येतोय… येतोय…” म्हणता म्हणता दीड महिना उलटला; मग हा राजीनामा नेमका कोणत्या मुहूर्तावर होणार? अशी उपरोधिक चर्चा रंगू लागली आहे.

राजीनामा की राजकीय ‘ट्रेलर’?

सभापतींच्या घोषणेनंतर बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र घोषणा आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये एवढे अंतर पडल्याने आता इच्छुकांचीही उत्सुकता ताणली गेली आहे.

राजीनाम्याचा ट्रेलर तर दाखवला, आता पूर्ण चित्रपट कधी? असा सवालही कार्यकर्त्यांमध्ये मिश्कीलपणे केला जात आहे.

एकीकडे पद सोडण्याची घोषणा, दुसरीकडे प्रत्यक्ष राजीनामा नाही—या विसंगतीमुळे बाजार समितीच्या राजकारणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही केवळ वेळ मारून नेण्याची रणनीती आहे की पक्षांतर्गत काही वेगळी राजकीय जुळवाजुळव सुरू आहे? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

‘तारीख पे तारीख’चा खेळ किती दिवस?

राजीनाम्याची घोषणा होऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. तरीही निर्णय होत नसेल तर आता नागरिकांनाही या प्रकरणाचा कंटाळा येऊ लागला आहे. घोषणा झाली, बातमी झाली, चर्चा झाली; आता प्रत्यक्ष राजीनामा कधी होणार? हा साधा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.

बाजार समिती ही शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या हिताशी संबंधित संस्था असल्याने तिच्या कारभाराबाबत स्पष्टता अपेक्षित असते. अशा परिस्थितीत सभापतीपदाच्या राजीनाम्याबाबत वारंवार चर्चा होऊनही प्रत्यक्ष निर्णय होत नसेल तर यामागचे नेमके कारण जनतेसमोर स्पष्ट होणे गरजेचे आहे.

फुसका बार की मोठ्या राजकीय खेळीची नांदी?

आता अमळनेरकरांच्या नजरा एका गोष्टीवर खिळल्या आहेत—सभापती अशोक पाटील यांचा प्रत्यक्ष राजीनामा कधी?

कारण घोषणा होऊन दीड महिना उलटत आला, तरी राजीनाम्याचा पत्ता नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच कुजबुज ऐकू येत आहे—

“राजीनाम्याचा बार उडवला खरा; पण आवाज झाला आणि धूरही निघाला… मात्र फटाका फुटलाच नाही!”

आता हा फुसका बार ठरतो की अखेर राजीनामा प्रत्यक्षात येऊन चर्चेला पूर्णविराम मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!