जिल्ह्यात विमलचा तुटवडा; पारोळ्यात मात्र अनेकांच्या तोंडात ‘इडा’…

0
Screenshot_20260721_211140_Google

पोलीस व FDA झोपले की झोपेचे सोंग घेताय ?

 

पारोळा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी विमलसह प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र आहे. छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याने या उत्पादनांच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याची चर्चा आहे. मात्र पारोळा शहरात याच्या नेमक्या उलट परिस्थिती दिसून येत असून अनेक ठिकाणी विमल सहज उपलब्ध होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

शहरातील काही किराणा, पानटपऱ्या व इतर छोट्या-मोठ्या दुकानांमधून खुलेआम किंवा मागणी केल्यानंतर विमलची विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. शहरातील चार जण या व्यवसायात सक्रिय असल्याची चर्चा असून त्यापैकी व्यंकटेश नगर परिसरातील एक व्यापारी मोठ्या प्रमाणात मालपुरवठा करत असल्याचे बोलले जाते. तसेच राम मंदिर परिसरातील आणखी एक व्यक्ती या व्यवसायातील प्रमुख नाव असल्याची चर्चा आहे. उर्वरित दोन जणही छोट्या-मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय चालवत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

केवळ शहरातच नव्हे, तर तालुक्यातील अनेक गावांतील लहान-मोठ्या दुकानांवरही विमल सहज उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रतिबंधित वस्तूंची इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्धता नेमकी कशी काय राहते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित यंत्रणांकडून नियमित कारवाई होत नसल्याने पोलीस व अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर शासनाने बंदी घातलेली असताना पारोळा परिसरात त्यांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे दिसत असल्याने संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशा व्यवसायामागील मुख्य पुरवठादारांपर्यंत पोहोचून संपूर्ण साखळी उघड करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे मत आहे.

दरम्यान, स्थानिक पातळीवर अशीही चर्चा रंगत आहे की, वेळेवर प्रसाद पोहच होत असल्याने काही संबंधित यंत्रणांकडून या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. मात्र या चर्चांना कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वास्तव समोर आणावे, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आता पारोळ्यात सुरू असलेल्या या कथित अवैध व्यवसायावर पोलीस प्रशासन व FDA कोणती ठोस कारवाई करते, की पुन्हा एकदा सर्व काही जैसे थे राहते, याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!