बिबट्या अमळनेर चौफेर; प्रशासन कुठे ?
मानवहानी होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?
अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून अमळनेर तालुक्यात बिबट्याचा वावर सातत्याने आढळून येत असून, विविध भागांत त्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागानेही बिबट्याच्या वावराला दुजोरा दिल्याची माहिती असताना, अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांत नांदगाव शिवार, सानेनगर, अमळनेर शहरातील ढेकू रोड परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटना समोर आल्या. आता शिरूड येथेही एका मजुराला बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्या दिसताच घाबरलेल्या मजुराने गावाकडे धाव घेत ग्रामस्थांना याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपुर्वी नंदगाव शिवारात त्याने काही प्राण्यांची देखील हाणी करत त्यांना ठार केले होते.
तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून येत असताना शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः पहाटे आणि सायंकाळच्या वेळी शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या घटना घडून पाच ते सहा दिवस उलटले, तरी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाकडे बिबट्याच्या हालचालींची माहिती असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात दिरंगाई का होत आहे, हा नागरिकांचा मुख्य प्रश्न आहे.
एखादी मानवहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? बिबट्याचा वावर वाढत असताना संभाव्य धोका टाळण्यासाठी वन विभाग आणि प्रशासन आता तरी तातडीने ठोस पावले उचलणार का, याकडे अमळनेर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
