पत्रकारांना तंबी देणारे पंकज चौधरी कोण?
तुमचे गुण गाणारे पत्रकार चालतात; मग प्रश्न विचारणारे पत्रकार खुपतात का?
अमळनेर : अमळनेरच्या राजकारणात सध्या एक वेगळाच पायंडा पडताना दिसत आहे. सत्तेत असताना तुमचे गुण गाणारा पत्रकार जवळचा आणि सत्तेला प्रश्न विचारणारा पत्रकार विरोधक, अशी नवी व्याख्या काही राजकारण्यांनी करून ठेवली आहे की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी नगर परिषद निवडणूक पार पडली. निवडणुकीपूर्वी निवडून आल्यास मालमत्ता कर कमी करू, अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, निवडून आल्यानंतर या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब जनतेने विचारणे स्वाभाविक आहे. हाच प्रश्न काही पत्रकारांनी बातम्यांच्या माध्यमातून उपस्थित केला.
यानंतर अमळनेरचे सामाजिक कार्यकर्ते सोमचंद संदानशिव यांनी मालमत्ता कराच्या मुद्द्यावर जनजागृती सुरू केली आणि आज याच विषयावर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बोलताना नगरसेवक पंकज चौधरी यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

पत्रकारांनी पत्रकारिता कशी करावी, कोणते प्रश्न विचारावेत आणि कोणते विचारू नयेत, याचा धडा देण्याचा प्रयत्न झाला, असे एका स्थानिक युट्युबरच्या म्हणण्यानुसार दिसून आले. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना अशा प्रकारे तंबी देण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर का यावी, हा खरा प्रश्न आहे.
विशेष म्हणजे, पंकज चौधरी विरोधी पक्षात असताना प्रशासक दालनात मालमत्ता कराविरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी याच पत्रकारांनी त्यांच्या आंदोलनाच्या मोठमोठ्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. तेव्हा हेच पत्रकार चांगले होते. त्यांच्या आंदोलनाला प्रसिद्धी देणारे हेच पत्रकार योग्य होते.
मग आज परिस्थिती बदलली कशी?
तेव्हा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारे पत्रकार योग्य आणि आज सत्तेत असलेल्या आपल्या गटाला प्रश्न विचारणारे पत्रकार चुकीचे, असा हा नवीन नियम आहे का?
सत्ता बदलली की पत्रकारितेची व्याख्याही बदलते का?
पत्रकार सत्तेत नसतो आणि विरोधातही नसतो. पत्रकाराचे काम प्रश्न विचारणे, जनतेचे प्रश्न मांडणे आणि सत्ताधाऱ्यांकडून उत्तर मागणे एवढेच असते. काल तुम्ही विरोधात होता, तेव्हा तुमच्या आंदोलनाला प्रसिद्धी देणारे पत्रकार आज सत्तेत आल्यानंतर तुम्हालाच प्रश्न विचारत असतील, तर त्यात पत्रकारांचा दोष काय?
चौधरीसाहेब, काल तुम्ही जे प्रश्न विचारत होता, तेच प्रश्न आज पत्रकार विचारत आहेत. फक्त फरक एवढाच आहे की, काल तुम्ही विरोधात होता आणि आज सत्तेत आहात.
म्हणूनच, पत्रकारांना पत्रकारिता शिकवण्यापेक्षा तुम्ही तुमचे जुने आंदोलन, जुनी वक्तव्ये आणि जुनी आश्वासने एकदा पुन्हा वाचून पाहिली, तर कदाचित आजच्या प्रश्नांची उत्तरे त्यातच सापडतील.
आणि हो… तुम्ही तुमचे वाचन विसरलात, तर त्यात पत्रकारांचा काय दोष?!
