दिल्लीला जाता येत नाही? मग २० जुलै रोजी अमळनेरमध्ये अन्यायाविरुद्धचा आवाज बना!

0
IMG-20260719-WA0034

दिल्लीत सोनम वांगचुंग व अभिजित दिपके यांच्यासोबत झालेल्या घटनेच्या विरोधात उद्या अमळनेर शहरात भव्य मोर्चा 

 

 

अमळनेर : “दिल्लीला जाऊ शकत नाहीत? हरकत नाही… पण अन्यायाविरुद्ध गप्प राहू नका. २० जुलै रोजी अमळनेरच्या निषेध मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या लढ्यात आपला आवाज बुलंद करा!” असे भावनिक आवाहन अमळनेर तालुक्यातील महाविकास आघाडी, जागृत तरुण आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्येष्ठ वैज्ञानिक सोहम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून जबरदस्तीने हटविण्यात आले, तसेच अभिजीत दिपके यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी अमळनेरमध्ये लोकशाही मार्गाने एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आयोजकांचे म्हणणे आहे की, हा लढा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका संघटनेचा नाही. हा देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, पारदर्शक परीक्षा व्यवस्थेचा आणि लोकशाही मूल्यांचा प्रश्न आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना अनेकांमध्ये निर्माण झाली असून, त्याविरोधात शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविणे ही प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे.

उद्या सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, अमळनेर शहरातील जिल्हा परिषद विश्रामगृहासमोर हा निषेध मोर्चा सुरू होणार आहे. या मोर्चामध्ये सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, तरुण-तरुणी, पालक, शेतकरी, कामगार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“तुम्ही दिल्लीला जाऊ शकत नसाल, तरी अमळनेरमध्ये नक्की या. तुमची उपस्थिती ही अन्यायाविरुद्धचा लोकशाही मार्गाने नोंदवलेला निषेध असेल. आज जर आपण शांत राहिलो, तर उद्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना अधिक बळ मिळेल. त्यामुळे चला, एकजुटीने पुढे येऊया आणि न्याय, पारदर्शकता व लोकशाही मूल्यांच्या समर्थनार्थ आपला आवाज बुलंद करूया,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न, लोकशाही हक्कांचे संरक्षण आणि अन्यायाविरुद्धचा लढा या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!