पारोळ्यात सट्टा-मटक्याचा सुळसुळाट
मुख्य बाजारपेठेसह बसस्थानक परिसरात खुलेआम व्यवहार, पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल
पारोळा : शहरात अवैध सट्टा-मटका व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील प्रमुख ठिकाणी हा व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. दिव्य लोकतंत्रने शनिवारी शहरातील वाढत्या अवैध धंद्यांबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष पाहणी केली असता, शहरातील अनेक भागांत सट्टा-मटक्याचे व्यवहार सर्रास सुरू असल्याचे निदर्शनास आले.
शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच इतर गर्दीच्या भागांमध्ये काही ठिकाणी दिवसभर सट्ट्याच्या पिढ्या सुरू असल्याचे दिसून आले. या ठिकाणांवरील दुकानांचे स्वरूप पाहता ते सामान्य व्यावसायिक दुकान असल्याचा भास होतो. मात्र, प्रत्यक्षात तेथे सट्टा-मटक्याचे व्यवहार सुरू असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही संभ्रमात पडत असल्याचे चित्र आहे.
स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की, शहरातील अनेक सट्टा पिढ्यांचे संचालन एकाच गटाच्या माध्यमातून केले जात असून, “भोई” नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचा या व्यवसायावर प्रभाव असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भातील आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी संबंधित यंत्रणांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, शहरात खुलेआम सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पारोळा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला असून, त्यानंतर शहरातील अवैध धंद्यांवर कोणती ठोस कारवाई करण्यात आली, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, मुख्य बाजारपेठेसारख्या संवेदनशील भागात जर दिवसाढवळ्या सट्टा-मटका सुरू असेल, तर संबंधित यंत्रणांना याची माहिती नसणे अशक्य आहे. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे की अन्य काही कारण आहे, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सट्टा-मटका हा केवळ बेकायदेशीर व्यवसाय नसून, अनेक कुटुंबांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर त्याचे गंभीर परिणाम होत असतात. अल्प उत्पन्न असलेले नागरिक सहज पैसे मिळण्याच्या आशेने या विळख्यात अडकतात आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. त्यामुळे अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून शहराला या विळख्यातून मुक्त करणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.
आता जिल्हा पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन शहरातील अवैध सट्टा-मटका व्यवसायावर धडक कारवाई करावी, संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
