अपूर्ण इमारतीत ‘ऍडमिशन ओपन’ कसे?
प्रशासन झोपेत की दुर्घटनेची वाट पाहतेय?

अमळनेर : शहरातील गलवाडे रस्त्यावरील एका नामांकित पोदार शाळेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नसताना शाळेचे ‘ऍडमिशन ओपन’ कशाच्या आधारे करण्यात आले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा धोकादायक परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बसवण्याची परवानगी कोणी दिली? बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अनेक नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागतात, बांधकामच पूर्ण नाही तर ते नाहरकत कसे मिळाले असतील या मुद्द्यांवरून प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहे.
सध्या शाळेच्या परिसरात बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आहे. अशा ठिकाणी लहान विद्यार्थ्यांची उपस्थिती ही थेट त्यांच्या जीवाशी खेळ करणारी बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.
मात्र, या सर्व प्रकारात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे – शाळेने ऍडमिशन सुरू केले आहेत तर बांधकाम पूर्णता प्रमाणपत्र मिळालेच असेल (Completion Certificate) आणि नसेल तर नसताना ‘ऍडमिशन ओपन’ कसे करण्यात आले? तसेच अग्निसुरक्षा (Fire Safety) नियमांचे पालन झाले आहे का? जर ही कागदपत्रे नसतील, तर संबंधित यंत्रणांनी डोळेझाक का करीत आहे?
दरम्यान “प्रशासन एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का?” कारण यापूर्वीही सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने अपघात घडलेले आहेत. तरीही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
स्थानिक प्रशासन, नगरपरिषद आणि शिक्षण विभाग यांची जबाबदारी असताना देखील अशा प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. केवळ कागदोपत्री नियम आणि प्रत्यक्षात शून्य अंमलबजावणी, अशीच परिस्थिती असल्याची टीका होत आहे.
आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ जागे होऊन शाळेची पाहणी करावी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
