राजस्थानच्या बॅन विद्यापीठातून पीएचडी
अमळनेरात चाललाय फसवणुकीचा धंदा!

अमळनेर : शहरात सध्या बोगस पीएचडी धारकांचा प्रकार उघडकीस येण्याच्या मार्गावर असून, काही जणांनी राजस्थानमधील एका बॅन झालेल्या विद्यापीठाकडून संशयास्पद पद्धतीने पीएचडी पदवी मिळवून शैक्षणिक संस्थांमध्ये आपले बस्तान बसवले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
या कथित पीएचडीच्या जोरावर काही जण खासगी शिक्षण संस्थांकडून मानधन लाटत आहेत, तर काहींनी थेट शासकीय नोकरीतून पगार घेत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे संबंधित राजस्थानमधील विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) आधीच बॅन केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे या विद्यापीठातून घेतलेल्या पदव्यांच्या वैधतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत दिव्य लोकतंत्रच्या हाती काही नावे लागली असून, लवकरच या सर्वांचा पर्दाफाश केला जाणार आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (UGC) अधिकृत तक्रार दाखल करण्याची तयारीही सुरू आहे.
दरम्यान, UGC कडून देशभरातील अशा संशयित पदव्यांची चौकशी सुरू असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे अमळनेरातील संबंधितांवरही कारवाईची टांगती तलवार लटकत आहे.
अजून अनेक चेहरे लवकरच समोर येणार असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
