अमळनेरात सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष ?
‘टांगा पलटी’च्या चर्चांना उधाण
नगराध्यक्ष कुठं तर नगरसेवक कुठं

अमळनेर : नगर परिषद निवडणूक होऊन काही महिने उलटताच सत्ताधारी शिवसेनेत अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. सुरुवातीला विकासाच्या मोठ्या घोषणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये आता विसंवाद वाढत असल्याने अमळनेरच्या राजकारणात अस्थिरतेची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
नगराध्यक्ष, तालुक्यातील शिवसेना पक्षनेते आणि काही नगरसेवक यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा जोर धरत आहे. अनेक नगरसेवक निर्णय प्रक्रियेत आपल्याला दुय्यम वागणूक दिली जात असल्याने नाराज असल्याचे समजते. परिणामी, गटबाजी वाढत असून सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
यातच आता एक गंभीर विषयावर चर्चा रंगू लागली आहे. नगराध्यक्ष स्वतः एका महत्त्वाच्या कागदावर सही घेतली जात नसल्यामुळे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनातील काही घटक किंवा सत्ताधारी गटातीलच अडथळ्यांमुळे हा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे नगराध्यक्षांनी थेट वरिष्ठ पातळीवर तक्रार देखील केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
ही बाब केवळ अंतर्गत नाराजीपुरती मर्यादित नसून सत्तेतील समन्वय पूर्णपणे ढासळत असल्याचे संकेत मानले जात आहेत. “प्रथम नागरिकांनाच त्यांच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांचे प्रश्न कोण सोडवणार?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शहरातील मूलभूत समस्या अद्याप प्रलंबित आहेत. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याचे प्रश्न आणि स्वच्छतेचा अभाव या मुद्द्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे विकासकामांना ब्रेक लागल्याचेही चित्र आहे.
राजकीय जाणकारांच्या मते “ही केवळ नाराजी नसून नेतृत्वावरचा विश्वास कमी होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. “जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर ‘टांगा पलटी’ होणे केवळ शक्यता नसून वास्तव ठरू शकते.”तर सध्या काही नाराज नगरसेवक मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
म्हणून अमळनेरचा कारभार नेमका कोण चालवत आहे? नगराध्यक्षांच्या तक्रारीवर वरिष्ठ काय भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
अमळनेरमध्ये पुढील काही महिने निर्णायक ठरणार असून सत्ताधाऱ्यांना अंतर्गत मतभेद मिटवण्यात यश येते की राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
