अमळनेरात बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा
सुमारे 3.07 लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अमळनेर येथे बनावट देशी–विदेशी मद्य तयार करून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ₹3,07,834/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मद्यनिर्मितीसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री, तयार मद्याच्या बाटल्या, झाकणं, रासायनिक साहित्य तसेच वाहनांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 12/02/2026 रोजी जळगाव–जवखेडा-मांडळ रोड, ढुले रोड परिसरातील आर.के. नगर भागात एका घरातून बनावट देशी व विदेशी मद्य तयार होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार दुय्यम निरीक्षक व पथकाने रात्री सुमारे 12.30 वाजता छापा टाकला. छाप्यात संबंधित इसमाकडून घरातच मद्यनिर्मिती सुरू असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :
एक हिरो होंडा डिलक्स दुचाकी
परराज्यातील मार्किंग असलेल्या 750 मि.ली. क्षमतेच्या विदेशी मद्याच्या बाटल्या (48 नग)
देशी दारूचे टँग पाउच (सुमारे 620 नग)
रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, झाकणं व कॅप्स
विविध ब्रँडचे देशी-विदेशी मद्याचे बुच, स्टिकर्स
200 लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम (मद्यनिर्मितीसाठी)
बनावट सील करण्याचे मशीन
25 लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये साठवलेले तयार मद्य
मोटारसायकल व इतर साहित्य
एकूण जप्त मालाची अंदाजे किंमत ₹3,07,834/- इतकी आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध मद्यनिर्मितीमुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा कारवायांवर विभागाकडून कडक नजर ठेवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक व पथकाच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दरम्यान स्थानिक नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत असून, अवैध मद्यविक्री व उत्पादनाविरोधात विभागाने अशीच कठोर भूमिका कायम ठेवावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.
