युवा निवडणुकीत राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

0

प्रताप महाविद्यालयात शिवसेनेचा हस्तक्षेप अयोग्य?

 

 

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालय, अमळनेर मध्ये होत असलेल्या YIN विद्यार्थी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महाविद्यालयीन परिसरात थेट शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि हालचालींमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

महाविद्यालयातील निवडणुका या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर, त्यांच्या नेतृत्वगुणांवर आणि शैक्षणिक वातावरणावर आधारित असाव्यात, अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. पक्षप्रणीत विद्यार्थी संघटना महाविद्यालयात कार्यरत असणे ही लोकशाही प्रक्रियेचा भाग मानला जाऊ शकतो; मात्र थेट राजकीय पक्षांचा हस्तक्षेप, पदाधिकाऱ्यांची लॉबिंग, दबाव तंत्र किंवा उघड प्रचार यामुळे शैक्षणिक वातावरण दूषित होत असल्याची टीका होत आहे.
काही विद्यार्थ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, “विद्यार्थी निवडणूक ही विद्यार्थ्यांचीच असावी. बाहेरील राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि प्रभावामुळे स्वतंत्र विचारांना बाधा येते.”

शिक्षणसंस्था या राजकारणाचे प्रयोगशाळा नसून भविष्यातील नेतृत्व घडविण्याची केंद्रे आहेत. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखत कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, संबंधित पक्षाकडून मात्र “विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा आमचा अधिकार आहे” अशी भूमिका घेतली जात असल्याची चर्चा आहे. परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की, मार्गदर्शन आणि हस्तक्षेप यामधील सीमारेषा नेमकी कोण ठरवणार?

विद्यार्थी निवडणुका या विचारांच्या लढाया असाव्यात, पक्षांच्या शक्तीप्रदर्शनाच्या नव्हेत, अशी भावना सध्या अमळनेरमध्ये जोर धरत आहे. आता महाविद्यालय प्रशासन आणि स्थानिक शिक्षण विभाग याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!