दिव्य लोकतंत्रच्या वृत्तानंतर खासगी गोदामावर कारवाई!

0
IMG-20261001-WA0042

रेशनचे धान्य खासगी गोदामात; दोन भावांवर गुन्हा दाखल

अंगठे घेतले, धान्य दिले नाही; ६४ हजार ८१६ रुपयांचा शासकीय साठा जप्त

अमळनेर : गरिबांच्या हक्काच्या रेशनचा साठा खासगी गोदामात ठेवण्यात येत असल्याबाबत ‘दिव्य लोकतंत्र’ने यापूर्वीच वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर नगाव खुर्द येथील खासगी गोदामाची प्रशासनाने तपासणी केली असता तब्बल ६४ हजार ८१६ रुपये किमतीचा शासकीय धान्यसाठा आढळून आला. साठा जप्त करून शासकीय गोदामात जमा करण्यात आला असून, या प्रकरणी रेशन दुकानदार प्रमोद गोसावी आणि त्यांचे भाऊ प्रवीण गोसावी यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद गोसावी हे नगाव बुद्रुक व नगाव खुर्द येथील रेशन दुकान क्रमांक १५२ व १५३ चालवितात. रेशनचा धान्यसाठा प्रवीण गोसावी यांच्या खासगी गोदामात ठेवला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ३० सप्टेंबर रोजी तहसीलदारांकडे केली होती.

 

 

तक्रारीची दखल घेत नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख, सचिन निकम आणि ग्राम महसूल अधिकारी सुधीर पाटील यांनी पंचांसमक्ष गोदामाची तपासणी केली. या कारवाईत १३.८३ क्विंटल मका, ९.३९ क्विंटल ज्वारी, १.५ क्विंटल साखर आणि ९१.५०० किलो गहू असा शासकीय साठा आढळला. संपूर्ण माल जप्त करून शासकीय गोदामात जमा करण्यात आला.

अंगठे घेतले; धान्य मात्र दिले नाही?

या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे ग्रामस्थांनी रेशन दुकानावर लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक अंगठे घेतले जात असून, त्यानंतर धान्य दिले जात नसल्याची तक्रार केली होती. तक्रारीनंतर ग्रामस्थांचे जबाबही नोंदविण्यात आले असून त्याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.

तक्रारीनंतर झालेल्या तपासणीत खासगी गोदामातच शासकीय धान्य आढळल्याने या आरोपांना तपासाच्या दृष्टीने अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. आता ई-पॉसवरील नोंदी, बायोमेट्रिक व्यवहार, धान्याची उचल, वाहतूक आणि प्रत्यक्ष वितरण यांचा ताळमेळ तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘दिव्य लोकतंत्र’च्या वृत्ताची दखल

खासगी गोदामातून रेशनचा माल विक्रीसाठी नेला जात असल्याच्या चर्चेसह या गोदामाबाबत ‘दिव्य लोकतंत्र’ने मागील वृत्तातून प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ग्रामस्थांची तक्रार, प्रशासनाची तपासणी आणि शासकीय धान्यसाठ्याची जप्ती यामुळे या प्रकरणाला आता ठोस तपासाची दिशा मिळाली आहे.

मात्र, खासगी गोदामात शासकीय धान्य नेमके कशासाठी ठेवण्यात आले होते, तेथे किती काळ साठवले गेले आणि रेशन वितरणातील नोंदींशी त्याचा काय संबंध आहे, याचा खुलासा पोलिस व पुरवठा विभागाच्या पुढील तपासातून होणे अपेक्षित आहे.

दोन भावांवर गुन्हा

या प्रकरणी प्रमोद गोसावी आणि प्रवीण गोसावी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(५) तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्य लोकतंत्रने उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर खासगी गोदामातील शासकीय साठा जप्त होऊन गुन्हा दाखल झाला आहे. आता तपास किती खोलवर जातो आणि रेशनच्या साठ्यापासून लाभार्थ्यांच्या अंगठ्यांपर्यंतचा संपूर्ण हिशोब प्रशासन बाहेर आणते का, याकडे अमळनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!