“मी माझ्या व्यथा कोणापुढे मांडू?” – अमळनेरमध्ये जातीय अन्याय, पोलीस उदासीनतेवर प्रश्नचिन्ह

0

छोटू जैनवर गुन्हा दाखल करण्यात पोलीस का धजावत नाहीत ?

 

अमळनेर : “ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली आहे… मी माझ्या व्यथा कोणापुढे मांडू?” असे रोखठोक शब्द लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी उच्चारले होते. आज तेच शब्द अमळनेर येथील समाधान मैराळे यांच्या परिस्थितीला तंतोतंत लागू होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
अनुसूचित जातीतील नागरिक असलेल्या समाधान मैराळे यांना अमळनेर येथील बिल्डर छोटू जैन यांनी जातीय आकसापोटी घर देण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी कायदेशीर तक्रार नोंदवण्यासाठी समाधान मैराळे गेल्या दोन दिवसांपासून अमळनेर पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र अद्याप त्यांचा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. पोलीस निरीक्षक म्हणतात की उपविभागीय पोलीस अधिकारी नाहीत, तर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना अमळनेरसाठी वेळ नाही. 

घर नाकारण्यासारखा प्रकार हा केवळ सामाजिक अन्याय नसून तो कायद्याने गुन्हा ठरत असतानाही पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. “जर पोलीसच दखल घेत नसतील, तर आम्ही आमच्या व्यथा कोणापुढे मांडायच्या?” असा थेट सवाल समाधान मैराळे यांनी उपस्थित केला आहे.

जातीय भेदभावासारख्या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासनाची ही भूमिका न्याय व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारी असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासन दखल घेणार का, की जातीय अन्यायाचा आवाज पुन्हा एकदा व्यवस्थेच्या भिंतीतच दबला जाणार, हा प्रश्न कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!