रस्त्यांवरील खड्डे देताय अभियंत्यांच्या बुद्धीला थेट आव्हान!

0

अमळनेर नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाची नामुष्की — खड्डे बुजतात, पण काही दिवसांतच पुन्हा “जिवंत”

 

 

अमळनेर : शहरातील रस्त्यांवरील खड्डे आता नागरिकांच्या जीवावर उठले असून, हेच खड्डे वारंवार त्याच ठिकाणी पुन्हा उघडत असल्याने अमळनेर नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागातील शिक्षित अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक वेळा खड्डे बुजवले जात असले तरी अवघ्या काही दिवसांत तेच खड्डे पुन्हा जिवंत होतात, हे प्रशासनाच्या अपयशाचे ठळक उदाहरण ठरत आहे.

गांधलीपुरा पोलीस चौकीसमोरचा रस्ता अनेक वेळा खचला असून, तेथे नगर परिषदेने केवळ दिखाऊ व तात्पुरती डागडुजी केली आहे. परिणामी रस्ता पुन्हा खचू लागला असून, या ठिकाणी प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

तसेच गलवाडे रोडवरील श्रद्धा नगर परिसरात शहराकडे वळताना मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा काही दिवसांपूर्वीच बुजवण्यात आला होता, मात्र तो पुन्हा उघडल्याने वाहतूक कोंडी वाढली असून वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. येथे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमळनेर–बोरी पुलावर देखील एकाच ठिकाणी अनेक खड्डे पडले असून, दोन्ही दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पारोळा चौफुली परिसरातही हीच स्थिती असून, येथील खड्डे जणू वेळोवेळी प्रशासनाला ‘आव्हान’ देत असल्याचे चित्र आहे.

अभियंत्यांना शिक्षणाच्या आधारावर भरघोस पगार व सुविधा दिल्या जात असताना, साधा एक खड्डाही कायमस्वरूपी बुजवता येत नसेल तर त्यांच्या पदव्यांची चौकशी करण्याची वेळ आली आहे, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे. निष्क्रिय अभियंत्यांच्या जागी कार्यक्षम, हुशार व होतकरू लोकांना संधी द्यावी, अशीही जोरदार मागणी जनतेतून पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!