विकासकामांचा खोटा श्रेयवाद?
पूर्वीच्या आमदारांच्या मंजुरीचीच यादी माजी आमदारांच्या पत्रकात

अमळनेर : अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार यांनी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची यादी टाकली असून त्यातील अर्धी कामे आधीच्या लोकप्रतिनिधींनी मंजूर केल्याचे उघड झाल्याने माजी आमदार चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
सदर पत्रकावर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मोजून फक्त २२ विकासकामे केल्याचा उल्लेख असून त्यात चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे बांधकाम, गांधली पुरा व सखाराम महाराज मंदिराजवळील बोरी नदीवरील पूल, अमळनेर पोलिस वसाहत, नगरपरिषद प्रशासकीय इमारत, सखाराम महाराज भक्तनिवास ह्या कामांचा समावेश आहे. मात्र ही विकासकामे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मंजूर केलेली असून त्याबाबतचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे स्वतःच्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात काहीच करता न आल्याने चौधरी यांनी आता दुसऱ्याची कामे स्वतःची म्हणून खोटे बोलणे सुरू केले आहे. असेच श्रेय लाटण्याचे प्रकार त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केले होते मात्र पाठपुराव्याची पत्रे आणि मंजुरीचे पुरावे, तारखा समोर आल्याने तेव्हा ही जनतेसमोर त्यांची चांगलीच फसगत झाली होती. नगरपरिषदेत जवळपास तीन वर्ष सत्ता असताना तेव्हा काय बोंब पाडली ? असा सवाल आता विचारला जात असून विकासाचे व्हिजन नसलेल्या चौधरी यांना २ तारखेला मतदार पुन्हा ठेंगा दाखवणार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
