जळगाव स्थायिक व्यक्तीला उमेदवारी का दिली… उत्तर मा. आमदारांनी का दिले नाही…?
डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाची विल्हेवाट कुठं लावली….

अमळनेर : अमळनेर नगरपरिषद निवडणुकीचे घोडामैदान जवळ आल्याने माजी आमदार बिथरले असून अनेक मातब्बर उमेदवार रिंगणात उतरण्यास तयार असताना माजी आमदारांनी जळगाव येथे स्थायिक असलेल्या उमेदवाराला नगराध्यक्षपदाची उमेदवारी का दिली ? याचे उत्तर अद्याप माजी आमदारांनी दिले नाही.
डॉ. परीक्षित बाविस्कर हे मूळचे अमळनेरचे असले तरी त्यांची कर्मभूमी जळगाव शहर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जळगावमध्ये व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रात स्थायिक झाल्यानंतर त्यांचा अमळनेर शहराशी सामाजिक किंवा राजकीय अशा कुठल्याही स्वरूपाचा संबंध विशेष उरलेला नव्हता. मात्र नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच ते मायभूमीत दाखल झाले.
सुरुवातीला त्यांनी अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले. त्याठिकाणी मुलाखत ही दिली मात्र आघाडीने त्यांना नकार दिल्यानंतर त्यांनी माजी आमदारांची भेट घेत शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळवली. ही उमेदवारी नेमकी कशाच्या आधारावर मिळाली ? यावरून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अमळनेरात स्थानिक पातळीवर सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेले तुल्यबळ उमेदवार उपलब्ध असताना ‘माजी आमदारांना डॉक्टरांमध्ये नेमके कोणते गुण दिसले ?’ ह्या प्रश्नाचे समर्पक उत्तर अद्याप ही दिले नाही.
डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाची योग्य विल्हेवाट लावली जात असल्याच्याही चर्चा असून यावरून किरकोळ वाद झाल्याच्याही चर्चा होत्या. मात्र सामान्य जनतेपर्यंत ह्या सर्व चर्चा पोहचत असल्याने जनता ही हुशार झाली आहे, असे विरोधकांनी म्हटले आहे.
