शहर विकास आघाडीचे इच्छुक उमेदवार परीक्षित बाविस्कर शिवसेनेत
नगराध्यक्ष पदासाठी जळगावहून अमळनेर वारी करणाऱ्या परीक्षित बाविस्करांची खरी परीक्षा

अमळनेर : नगराध्यक्ष पदाचे इच्छुक म्हणून परीक्षित बाविस्कर यांची पोस्टर्स काही दिवसांपूर्वी सर्वांच्या नजरेस आली होती. पोस्टर्सच्या माध्यमातूनच अमळनेरकरांना परिचित झालेल्या बाविस्कर यांनी अखेर शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ते शहर विकास आघाडीचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी ‘परक्या घराचा’ दरवाजा ठोठावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी जळगावहून अमळनेर वारी करणाऱ्या परीक्षित बाविस्कर यांना आता अमळनेरकरांसमोर मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे. सध्या अमळनेर नगर परिषदेवर मोठे कर्ज असून प्रशासनाबाबत जनतेत नाराजी आहे. महाराष्ट्रातील इतर नगर परिषदेच्या तुलनेत अमळनेरकरांकडून दुप्पट कर आकारला जात असल्याची तक्रार आहे. अनेक दिवस नळाला पाणी येत नाही, तर आरोग्याच्या समस्या ऐरणीवर आहेत. अशा प्रश्नांनी तळमळणाऱ्या अमळनेरकरांच्या अपेक्षांना परीक्षित बाविस्कर कसे उतरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
