नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला
राज्यात आचारसंहिता लागू

अमळनेर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषद निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 अशी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज परत घेण्यासाठी 21 नोव्हेंबर ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली असून, उमेदवारांना 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
निवडणुकीसाठी मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून, मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी पार पडेल. निकाल जाहीर झाल्यानंतर 10 डिसेंबर 2025 रोजी राजपत्र प्रसिद्ध केले जाणार आहे.
या वेळेस उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापण्याची चिन्हे असून, सर्व पक्षांनी निवडणूक लढतीसाठी कंबर कसली आहे.
