अमळनेर पंचायत समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्याकडून शासनाची फसवणूक!
अनेक दिवस गैरहजेरी असूनही घेतो पगार – अधिकाऱ्यांचा आश्रय असल्याची चर्चा

अमळनेर : पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागातील कंत्राटी कर्मचारी किशोर ठाकरे याने शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे हा अनेक वेळा वैयक्तिक कारणांसाठी विनापरवानगी गैरहजर राहतो, मात्र त्याला दर महिन्याला पूर्ण पगार देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
गैरहजेरी असूनही ‘फुल पगार’?
किशोर ठाकरे हा कर्मचारी महिन्यातून सरासरी ८ ते १० दिवस वैयक्तिक कामांसाठी अनुपस्थित राहतो. अशा स्थितीतही त्याच्या पगारात कोणतीही कपात न करता पूर्ण वेतन देण्यात येते. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचा हात असल्याची चर्चा स्थानिक प्रशासनात जोर धरत आहे. संबंधित कर्मचाऱ्याकडून काही आर्थिक देवाणघेवाण होत असल्याची शंका व्यक्त केली जात असून, त्यामुळे शासनाच्या निधीची मोठी फसवणूक होत असल्याचे आरोप आहेत.
रोजगार हमी योजनेत अनियमितता?
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे याने रोजगार हमी योजनेच्या मस्टर काढण्याच्या प्रक्रियेतही अनेक अनियमितता केल्या असून, या माध्यमातून त्याने अवैध संपत्तीही मिळवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीतील काही संबंधितांनीही या अनियमिततेबाबत आपला संताप व्यक्त केला आहे.
शासनाच्या निधीवर डल्ला!
शासनाने ग्रामीण भागातील गरजू मजुरांना रोजगार देण्यासाठी सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेचा हेतू असा प्रकार घडल्याने बदनाम होत असल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. एका कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे आणि काही अधिकाऱ्यांच्या आश्रयामुळे शासनाच्या कोट्यवधींच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे सांगितले जात आहे.
चौकशीची मागणी
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून आणि काही सामाजिक संघटनांकडून होत आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असून, लवकरच अधिकृत निवेदन दिले जाणार आहे.
नागरिकांमध्ये संताप
सतत प्रामाणिकपणे काम करणारे अनेक कंत्राटी कर्मचारी पगारासाठी संघर्ष करतात, तर काही जण गैरहजेरी असूनही पगार घेत असल्याने प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. शासनाच्या निधीची फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा न झाल्यास अन्य कर्मचाऱ्यांना चुकीचा संदेश जाईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
