वाढदिवस जल्लोषात साजरा न करता शेतकऱ्यांना मदत

0

सभापती अशोक पाटील यांचा अभिनव उपक्रम

 

अमळनेर  : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करता तो खर्च आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

दरवर्षी सभापती अशोक पाटील यांचा वाढदिवस कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते, विविध शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी तसेच अशोक भाऊ मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने पाटील यांनी सामाजिक जबाबदारीचा परिचय देत वाढदिवसाच्या खर्चातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सभापतींची पत्नी व आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. योगिता अशोक पाटील या मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारीची तयारी करत आहेत. या गटातील वासरे, खेडी, खर्दे या गावांसह अनेक भागात कापूस व मका पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वाढदिवसाचा निधी देण्याचा निर्णय सभापतींनी घेतला आहे.

 


“शेतकऱ्यांवर संकट असताना जल्लोष योग्य नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रपरिवार, हितचिंतक व कर्मचारी वृंद यांनी मला भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ देण्याऐवजी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्यास, तोच माझ्यासाठी खरी वाढदिवसाची भेट ठरेल. अशा मदतीतून शेतकरी पुत्राचा वाढदिवस साजरा झाल्याचे समाधान मला लाभेल.”

अशोक पाटील

सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर

 

सभापती पाटील यांचा हा निर्णय सामाजिक बांधिलकी व शेतकरीप्रेमाचा उत्कृष्ट आदर्श ठरला आहे. अमळनेर व परिसरात त्यांच्या या पावलाचे सर्वत्र स्वागत होत असून, “शेतकऱ्यांसाठी जगणारा खरा नेता” म्हणून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!