सत्ता म्हणजे साटेलोटेच का? – राजकारणात सर्व काही आधीच ठरलेलं असतं का?

महायुतीच्या माध्यमातून तिघे विरोधक एकत्र येणार का ??
अमळनेर : “राजकारणात काहीही शक्य आहे” ही जुनी म्हण आता वास्तव वाटायला लागली आहे. मतदार वेगळी दिशा दाखवतो, जनतेच्या भावना वेगळ्या असतात, पण राजकीय नेत्यांची समीकरणं मात्र आधीच ठरलेली असतात. आणि सध्याच्या अमळनेरमधील राजकीय हालचाली हेच वास्तव अधोरेखित करतात.
शिरीष चौधरी – माजी आमदार, आणि सलग तीन वेळा अनिल पाटील यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुका लढवलेले कट्टर विरोधक.
साहेबराव पाटील – एकेकाळचे आमदार, अनिल पाटलांवर नाराजी व्यक्त करून गायब झालेले.
अनिल पाटील – विद्यमान आमदार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी, आणि महायुतीतील प्रमुख चेहरा.
हे तिघेही आता महायुतीत एकत्र येत आहेत. म्हणजे ज्या नेत्यांमध्ये परस्परविरोध, कट्टर राजकीय संघर्ष होता, ते आज एका बाजूने जात आहेत. कारण एकच – सत्ता!
आजचं राजकारण हे विचारधारांच्या आधारे नव्हे, तर “जिथे सत्ता तिथे साथ” या तत्वावर चाललं आहे. एकमेकांवर आरोप करणारे, विरोधात प्रचार करणारे, आता निवडणुकीच्या तोंडावर हातात हात घालून उभे राहणार! अशी चिन्हे आहेत.
ही महायुती नसेल – तर ही महासाटेलोट्याची राजकीय सौदेबाजीच म्हणावी लागेल. असे अनेकांचे मत आहे.
जनतेला मूर्ख समजलं जातंय का?
जनतेला मूर्ख समजलं जातंय का हा खरा व मोठा प्रश्न आहे. मतदारांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे –
ज्यांना आपण विरोधी पक्षात ठेवतो, त्यांच्याशीच आपले निवडून दिलेले नेते साटेलोटं करत असतील, तर मताचं मोल काय उरलं?
विधानसभेत एकमेकांविरोधात बोलणारे, आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकाच तंबूमध्ये दिसणार आहेत.
– मग हे सगळं आधीच ठरलेलं नव्हतं का?
लोकशाहीचा खेळ की थेट सौदा?
आजचं राजकारण लोकहितासाठी नाही, तर पद, पैसा आणि प्रतिष्ठा यासाठी चालतंय. विचारधारा, निष्ठा, आणि जनतेचा विश्वास – या सगळ्यांना किमती नसलेल्या वस्तूप्रमाणे फेकून दिलं जातंय.
नेत्यांचं गणित सोपं आहे “जेव्हा हवा वेगळी वाहते, तेव्हा झेंडाही बदलतो.”
“जिथे सत्ता, तिथे आपली जागा.” राजकारणात सर्व काही ठरतं – पण ते जनतेच्या डोळ्यांत धुळफेक करूनच ठरतं. हे सर्व पाहूनही आपण गप्प बसणार का? की आता मतदार म्हणून सडेतोड भूमिका घेणार? हा प्रश्न आहे.
डॉ. समाधान मैराळे
मुख्य संपादक – दिव्य लोकतंत्र
