पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोमात….
पोलीस निरीक्षकांच्या घराच्या जवळपास सुमारे 10 सट्ट्यांचे अड्डे
जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज

अमळनेर : मटका, जुगार, दारू, गांजा, गुटखा आदी अवैध धंदे तेजीत सुरू असताना अमळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेत आहेत.
अमळनेर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात चोर्या व घरफोड्या हे गुन्हे देखील वाढले आहेत. शहरात मटका जोरात सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण पुरवण्यात येत आहे. खुद्द पोलिस निरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर सुमारे 10 ठिकाणी मटका सुरू आहे. स्थानिक पोलिसांशी संगनमत करून खुलेआम मटका चालतो. अमळनेर पोलीस ठाणे हद्दीत सुमारे दोनशे ठिकाणी मटका सुरू आहे.
जुगाराचेही काही मोठे अड्डे पोलीस ठाणे हद्दीत सुरू आहेत. ठरावीक रक्कम दरमहा पोहोच केली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. अनेक ठिकाणी राजरोसपणे जुगार सुरू असताना पोलिस दुर्लक्ष करतात. गेल्या काही महिन्यात या अड्ड्यांवर कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही.
विविध कारणांवरून पोलिस निरीक्षक व कर्मचारी यांच्यावर आरोपांच्या गोळ्या झाडल्या जातात, शनिवारी देखील दिव्य लोकतंत्रने अवैध धंद्यांसंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. मात्र तरी पोलीस निरीक्षकांना कारवाई करावी असे वाटले नाही.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांची प्रतिमा स्वच्छ आहे. ते एक डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र अमळनेर येथील अधिकारी व काही कर्मचारी अवैध धंद्याला देत असलेल्या संरक्षणामुळे त्यांच्या या प्रतिमेला तडा जात आहे.
अमळनेर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदे वाल्यांकडून दरमहा प्रोटेक्शन मनी घेतली जात आहे. तर काही महिन्यांपूर्वी सट्टे बुकींकडून प्रोटेक्शन मनी म्हणून सुमारे पंचवीस हजार रुपये वाढवले गेले असल्याची चर्चा आहे.
दरम्यान हे सर्व धंदे लवकरात लवकर थांबावेत हीच अपेक्षा !
