शेवटी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या लढ्याला यश….

पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे भोवले ; पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची उचलबांगडी
जळगाव : पाचोरा येथील पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा व इतर तीन पत्रकारांवर पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांनी काही लोकांना हाताशी धरून गुन्हे दाखल केले होते. ह्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी निवेदने देण्यात आली. तर जळगाव येथे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने देत आंदोलन झाले होते. यानंतर जर पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची तात्काळ बदली करावी अन्यथा महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन होईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने याची गंभीर दखल घेत शेवटी शनिवारी पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची जळगाव नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तर त्यांच्या जागी राहुलकुमार पवार यांची पाचोरा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची सखोल चौकशी व्हावी व त्यांना निलंबित करावे अशीही मागणी करण्यात आली असल्याने याबाबत देखील प्रशासनाने चौकशी सुरू करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया सेलचे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा लढ्याला यश आले असून पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना भोवले असल्यानेच त्यांची उचलबांगडी नियंत्रण कक्षात झाली आहे. या लढ्याचे शंख फुंकणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, यांचे पत्रकार बांधवांकडून आभार मानण्यात येते आहेत.