बौद्ध, मेहतर व मुस्लिमांना घरे न देणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हा करा… अमळनेर पोलीस निरीक्षकांकडे तक्रार
तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
अमळनेर : येथील बिल्डर्स जातीयवादी मानसिकतेतून बौद्ध, मेहतर आणि मुस्लिम या समाजांना घरे देत नाहीत या बाबत दिव्य लोकतंत्रने काही दिवसांपासून मालिका सुरू केली होती. यानुसार अनेक बिल्डर्स लोकांची पोलखोल करणयात आली असून अनेक तक्रारदार समोर आले आहेत.
अनेक तक्रारदार यांनी दिव्य लोकतंत्रकडे स्वयंघोषणापत्र करून दिले असून यात त्यांनी त्यांचे नाव, पत्ता कोणत्या बिल्डरने घरं दिले नाहीत या बाबत लेखी दिली आहे. तर ती लेखी आज पर्यंत देणे सुरू असून अजून तक्रारदार अजून समोर येत आहेत.
यातील एका बौद्ध समाजातील तक्रारदाराने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित बिल्डर लोकांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. यात तक्रारदाराने म्हटले आहे कि, मी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुंदडा बिल्डर्सचे ओमप्रकाश मुंदडा, तर चार वर्षांपूर्वी आदित्य बिल्डर्सचे प्रशांत निकम, मागील वर्षी सरजूसेठ गोकलानी, तर दोन वर्षांपूर्वी नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन यांच्या कडे देखील घरं घेण्यासाठी गेलो होतो. मी गेल्या 3 – 4 वर्षांपूर्वी पासूनचे इन्कम टॅक्स देखील भरत असून माझ्याकडे त्याची फाईल देखील आहे. वरील सर्व बिल्डर्स लोकांना माझी जात माहीत असुन ते अमळनेर मधील बौद्ध, मेहतर व मुस्लिम लोकांना घरे देत नाहीत. त्याच प्रमाणे मलाही त्यांनी घर दिले नाही. वरील सर्वांना फोन केला असता घरे बुक झाली आहेत असे ते कायम सांगत असतात तर इतर दुसऱ्या जातीचा कुणी व्यक्ती गेला तर त्या व्यक्तीस ते घर देऊन देतात. मात्र आमच्या जातींना ते लोकं जातीयवादी मानसिकतेतून घरे देत नाहीत. त्याच प्रमाणे मलाही घर दिले नाही म्हणून माझी वरील सर्व बिल्डर्स विरुद्ध तक्रार असून त्यांच्यावर अट्रोसिटी कायद्यानुसार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. तर गुन्हा दाखल न झाल्यास येत्या काही दिवसात सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन केले जाईल असा इशारा देखील पत्राद्वारे देण्यात आला आहे.