बीडीओ शिंदे व सहायक कार्यक्रम अधिकारी ठाकरे यांच्यावर कारवाई करा अन्यथा 25 रोजी आत्मदहन…
जानवे येथील शेतकरी शरद पाटील व सुभाष पाटील यांचा इशारा

अमळनेर : तालुक्यातील जानवे येथील शेतकरी शरद पाटील व सुभाष पाटील यांनी अमळनेर गट विकास अधिकारी किशोर शिंदे व रोजगार हमी योजना सहायक कार्यक्रम अधिकारी किशोर ठाकरे यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करा अन्यथा 25 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील जानवे येथील शेतकरी शरद पाटील व सुभाष पाटील यांच्या शेतात रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवड करण्यात आली आहे. याचा प्रस्ताव त्यांनी ऑनलाइन ऍप द्वारे गेल्या १३० दिवसांपूर्वी दाखल केला आहे. हा प्रस्ताव ४५ दिवसात मंजूर होणे आवश्यक असते मात्र तरी हा प्रस्ताव अजून मंजूर झालेला नाही. तक्रारदार हे गट विकास अधिकारी किशोर शिंदे व रोजगार हमी योजना सहायक कार्यक्रम अधिकारी किशोर ठाकरे यांच्याकडे गेले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचेचे तक्रारदारांनी तक्रारीत म्हटले आहे. पात्र लाभार्थी असतांना सुद्धा माझ्या कामात हेतुपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. म्हणून यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी तक्रारदार शरद पाटील व सुभाष पाटील यांनी केली आहे. अन्यथा दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी आत्मदहन करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
