विहिरीत पडलेल्या गाईला अमळनेर अग्निशमन दलाकडून जीवदान
बचाव कार्य करणाऱ्यांचे सर्वत्र कौतुक
अमळनेर : जुन्या वाघ बिल्डिंगच्या मोकळ्या जागेवरील विहिरीत पडलेल्या गायीला अमळनेर पालिकेच्या अग्निशमन दलाने जीवदान दिले आहे. ही घटना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या कामगिरीबद्दल अग्निशमन दल व मदत करणाऱ्या तरुणांचे कौतुक होत आहे.
बुधवारी सकाळी बालाजीपुरा भागातील जुन्या वाघ बिल्डिंगच्या मोकळ्या जागेतील खोल विहिरीत एक गाय पाय घसरून पडली होती. ही बाब प्लॉटसमोर सुरू असलेल्या बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास आली. त्यांनी परिसरातील रहिवासी छायाचित्रकार अनिल महाजन यांना माहिती दिली. महाजन यांनी लागलीच त्यांचा पुत्र सागर व जवळच्या नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर अमोल माळी, दिनेश माळी आदींसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख दिनेश बिऱ्हाडे, त्यांचे सहकारी व रोहित महाजन या तरुणाने शर्थीचे प्रयत्न करून गाईला सुखरुप बाहेर काढले. त्यांनतर गायीला चारापाणी करून मोकळ्या जागेत सोडून देण्यात आले. विहिरीत उतरून गायीला बाहेर काढल्याबद्दल दिनेश बिऱ्हाडे, रोहित महाजन यांच्या धाडसाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
दरम्यान, माजी नगरसेवक बाळासाहेब महाजन यांनी अनिल महाजन व रोहित महाजन यांचा रोख बक्षीस देऊन सन्मान केला. तसेच तत्परतेने दाखल झालेल्या अग्निशमन दलाचे दिनेश बिऱ्हाडे व त्यांच्या सहकाऱ्यांचाही सत्कार केला. यावेळी लताबाई महाजन, बाळासाहेब महाजन, विलास महाजन, योगेश महाजन, सागर महाजन, दिनेश माळी, महेश पाटील, निंबा वाणी आदी उपस्थित होते.