अमळनेरचे शांतीदूत करणार आज “श्री सन्मान”

0

दगडी दरवाज्याच्या आतमध्ये भव्य मंचावरून होणार मिरवणुकांचे स्वागत

अमळनेर : परंपरेप्रमाणे शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करून शहराची शांतता प्रस्तापित ठेवणाऱ्या आदर्श मंडळांचा “श्री सन्मान” आज अनंत चतुर्दशीला अमळनेरच्या शांतिदूतांकडून होणार आहे.
यासाठी गणेशोत्सवात अति संवेदनशील क्षेत्र ठरणाऱ्या दगडी दरवाज्याच्या आत भव्य मंच उभारण्यात आला असून त्याठिकाणीच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शांतताप्रिय मिरवणुकांचे अनोखे स्वागत व सन्मान केला जाणार आहे.अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, मुंदडा फाऊंडेशन,अमळनेर,अमळनेर पोलीस स्टेशन,अमळनेर नगरपरिषद आणि महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर आदींच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.गेल्या वर्षी देखील हा उपक्रम राबविला असता सर्व मंडळांनी भरभरून दाद देत सदर मंचावरून होणाऱ्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले होते, परिणामी कोणताही गोंधळ न होता सर्व मिरवणूक शांततेत पार पडल्या होत्या.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ नेहमीच सामाजिक व शासकीय उपक्रमात सहभागी होऊन सकारात्मक उपक्रम राबवत असतो. मागील वर्षाचा चांगला अनुभव पाहता पत्रकार संघ आणि मुंदडा फाऊंडेशन यांनी यावर्षी देखील पुढाकार घेतल्याने पोलिस विभाग,नगरपरिषद आणि महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या सर्वांनी यात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे.तरी सर्व मंडळांनी शांतीदूत होऊन श्री सन्मानाचे मानकरी ठरावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान यावेळी सातव्या व नवव्या दिवशी शांततेत विसर्जन करणारे आदर्श मंडळ आणि हिंदू मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी वर्गालाही येथे सन्मानित केले जाणार असल्याने त्यांनीही उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!