डीजे व गुलाल फेकण्यावरुन झालेला वाद आला चव्हाट्यावर…
दगडफेकीच्या अफवेने अमळनेरात तणाव
कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल… पोलीस निरीक्षक विकास देवरे
अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात काल रविवारी डीजे व गुलाल वरून झालेला वाद चांगलाच चव्हाट्यावर आलेला होता. तर या वादात दगडफेक झाल्याच्या अफवा अमळनेर तालुक्यातील कानाकोपऱ्यात पोहचल्या होत्या. व काही धार्मिक संघटनांनी आपली पोळी देखील भाजण्याचा प्रयत्न यावेळी केलेला दिसला.
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती. यात डीजे लावून गुलाल उधळत आनंदाने मिरवणूक सुरू होती. मिरवणूक वाजत – गाजत इतर धर्मियांच्या वाड्यात पोहचली. तेव्हा तेथील इतर धर्मिय काही तरुणांना गणपती विसर्जनातील काही गाणी व गुलाल सहन झाला नसल्याने त्यांनी तेथे विरोध दर्शवला व हे सर्व बंद करून पुढे जाण्यास सांगितले. मात्र या विषयावरुन त्याठिकाणी किरकोळ वाद निर्माण झाला होता. या वादानंतर मिरवणूक पुढे निघाली व रस्त्यावर ब्रेकर असल्याने रथावरील दोन्ही गणेश मुर्त्या एकमेकांना ठोकल्या गेल्या व एका गणेश मूर्तीचा हात तुटला असल्याचे अमळनेर पोलिसात दाखल फिर्यादीत म्हटले आहे. मात्र हात इतर धार्मिय लोकांनी तोडला असल्याचे सांगत काही धार्मिक संघटनांच्या लोकांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न यावेळी केला. फरशीरोड भागत मोठा जमाव जमा होऊन आरोपींना अटक करण्याची मागणी झाली, हा जमाव सुमारे दोन तास तेथेच बसून होता. त्यामुळे अमळनेर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कवीता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहायक पोलिस निरीक्षक गावित यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ आंदोलन स्थळी धाव घेत जमाव शांत केला. मात्र रात्रभर शहरात तणावपूर्ण शांतता होती तर शहरात जिल्हा पोलिसातील विविध पथकं, राज्य राखीव पोलीस दल यांचा तगडा बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
तर तर गांधलीपुऱ्यात झालेल्या या वादाबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 189 (1), 189 (2), 191 (2), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1), 37(3) व 135 प्रमाणे नवाज खाटीक, रिझवान शेख, सोहिल शेख व अज्ञात 2 अशा सुमारे 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नवाज खाटीक यास अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.
अमळनेर शहरातील सर्व घटनांवर पोलिसांची बारीक नजर असून चुकूनही कुणी कायदा सुव्यवस्था बिगडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही. कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल. काल जो वाद झाला यातील एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये व गणेशोत्सव तसेच ईद हे दोन्ही सण शांततेत व आनंदाने साजरे करावेत हेच आवाहन !
विकास देवरे
पोलीस निरीक्षक, अमळनेर